वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून कंपन्यांनी नाकारल्या जाहिराती
वॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये एका कृष्णवर्णीयाची पोलीस अधिकाऱ्याकडून हत्या झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत वातावरण तापले आहे. यासंदर्भात फेसबुक योग्य भूमिका घेत नाही म्हणून काही नागरी हक्क मंचांनी फेसबुक विरोधात बहिष्काराचे आवाहन केले आहे.
फेसबुकवर मोठ्या कंपन्यांनी जाहिराती देऊ नयेत, असेही सांगितले आहे. त्यानंतर बऱ्याच कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या असल्यामुळे फेसबुकचा महसूल झपाट्याने कमी होत आहे.
वंशभेदाला चालना मिळेल अशा पोस्ट फेसबुकने वगळाव्यात असे आवाहन नागरी हक्क गटांनी फेसबुकला केले होते. हे व्यासपीठ सर्वसमावेशक असल्यामुळे असे करता येणार नाही, असे फेसबुकने म्हटले होते. त्यानंतर या गटांनी विविध जाहिरात देणाऱ्या कंपन्यांना जाहिराती देऊ नये, असे आवाहन केले होते. आतापर्यंत 90 कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत फेसबुकवरून काढून घेतल्या आहेत.
ज्या कंपन्यांनी जाहिराती काढून घेतल्या आहेत, त्यामध्ये बऱ्याच मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये युनिलिव्हर, स्टार बक्स, कोकाकोला, मोझिला इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे फेसबुकचा महसूल झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
या काळात फेसबुकचे भांडवली मूल्य 56 अब्ज डॉलरनी कमी झाले आहे. त्याचबरोबर फेसबुकचे संस्थापक झुकरबर्ग यांच्या मालमत्तेत 7.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील आहे.