पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांचे नगरविकास मंत्र्यांकडे पुन्हा अपिल
सातारा -सातारा पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांनी कायम स्वरुपी आस्थापनेवर येण्यासाठी शक्य तितका व निकराचा लढा सुरु ठेवला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा अपिल दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
वीस वर्षाहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर कायम करून त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, यासाठी पालिकेच्या छत्तीस कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे निकराचा लढा चालूच ठेवला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची स्वतःच्याच सहीची दिलेली पत्रे मुख्याधिकाऱ्यांनीच नाकारल्याने प्रशासन व कर्मचारी यांच्यात मोठा वाद झाला. गोरे यांनी नगर परिषद संचालनालयाचे नाव सांगून स्वतःची जबाबदारी झटकल्याने छत्तीस जणांच्या पुनर्वसनाचा गुंता आणखीनच वाढला.
या कर्मचाऱ्यांनी पालिका प्रशासनाचा नाद सोडून थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घातले आहे. त्यासाठी या छत्तीस कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दोन वेळा मुंबई दौरा केला मात्र एकनाथ शिंदे पालकमंत्री या नात्याने गडचिरोलीच्या दौऱ्यावर असल्याने भेट होऊ शकली नाही. परंतु शिंदे यांच्या दरे बु. या मूळ गावी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी त्यांची भेट घेऊन छत्तीस जणांच्या पुनर्वसनाची विशेष बाब म्हणून संधी मिळण्याची विनंती केली होती.एकनाथ शिंदे यांनी या छत्तीस जणांना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तारीख दिल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळाला नाही.
दरम्यान, नियोजित बैठकीची वेळ व दिनांक न ठरल्याने कर्मचारी सतत मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या संपर्कात आहेत. पालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी घेऊन वेतन आयोगाचे लाभ मिळावे हा मागणी अर्ज व छत्तीस कर्मचाऱ्यांच्या सेवेचे टप्पे, झालेल्या पदोन्नती, नगरपालिकेने दिलेल्या ऑर्डर या सर्व महत्वाची बाबी संबंधित अपिलात नमूद आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
36 कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनात पूर्णपणे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे दिसत आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन वेळा मंत्रालयात या प्रश्नावर दाद मागितली, पण उपयोग झाला नाही. कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनापेक्षा कर्मचाऱ्यांनी दीड लाखाच्या प्रमाणात 53 लाखांची जी वर्गणी काढली त्याचा नको इतका झालेला बोभाटा अडचणीचा ठरला आहे. डीएमए कार्यालयात सातारा आणि 36 कर्मचारी म्हणले की कोणत्याच टेबलासमोर उभे केले जात नाही, असे कर्मचारी सांगतात.