पुणे : केंद्र सरकारच्या महसूल विभागाने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार लॉटरी कायद्यामध्ये दुरुस्ती केली असून सर्व प्रकारच्या लॉटरीवर आता समान 28 टक्के जीएसटी लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच म्हणजे 1 मार्चपासून होणार आहे. राज्याद्वारा वितरित केल्या जाणाऱ्या लॉटरीवर आणि राज्याद्वारा मान्यता दिलेल्या लॉटरीवर समान 28 टक्के जीएसटी कर आकारण्यात यावा, असा निर्णय डिसेंबरमध्ये जीएसटी परिषदेने घेतला होता. त्याची अंमलबजावणी होणार आहे.
लॉटरी पुरवठ्यावर केंद्राचा कर 14 टक्के तर, राज्यांचा 14 टक्के राहणार आहे. त्यामुळे एकूण कर 28 टक्के होणार आहे. सध्या राज्याद्वारा वितरित केल्या जाणाऱ्या लॉटरीवर 12 टक्के जीएसटी लागतो तर, राज्यद्वारा मान्यता दिलेल्या लॉटरीवर 28 टक्के इतका कर लागतो. सर्व लॉटरीवर समान कर असावा अशी मागणी केल्यानंतर जीएसटी परिषदेने यावर विचार करण्यासाठी मंत्री समिती नेमली होती. या मंत्री समितीने केलेल्या शिफारशींनुसार सर्व लॉटरीवर 28 टक्के इतका समान कर लावण्याची शिफारस केली होती.
काही राज्यांमध्ये लॉटरीला बंदी आहे तर, काही राज्यांत इतर राज्यांच्या लॉटऱ्या विकल्या जातात. या अगोदर राज्यांची लॉटरी आणि राज्यांनी मान्यता दिलेली लॉटरी यामध्ये करात फरक होता. आता या नव्या नियमांमुळे सर्व कर समान झाला आहे. यामुळे लॉटरी विक्रेते आणि खरेदी करणाऱ्यांना सोय झाली असल्याचे ईवाय टॅक्स या संस्थेचे भागीदार अभिषेक जैन यांनी सांगितले.