सातारा – देवगिरी प्रतिष्ठानच्यावतीने यंदा आग्रा येथे साजरा होणाऱ्या शिवजयंती महोत्सवाला शिवछत्रपतींचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वा जयंती सोहळ्यात आग्र्यात प्रत्यक्ष आणि डीजिटल माध्यमांतून दोन कोटी शिवभक्त सहभागी होतील. शिवरायांची शौर्यगाथा देश आणि जगाला सांगण्याचा आणि दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी सांगितले. .
देशाच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. औरंगजेबासारख्या कपटी आणि कारस्थानी बादशहाने छत्रपतींना कैद करण्याचा डाव याच किल्ल्यात रचून महाराजांना नजरकैदेत ठेवले. परंतु, गनिमी काव्याचा अवलंब करत औरंगजेबाच्या हातावर तुरी देत महाराष्ट्रात सुखरूप येण्याचा पराक्रम शिवाजी महाराजांनी केला.
पावसाळ्यात मराठ्यांच्या घोड्यांना बाहेर जागा मिळेना, म्हणून याच आग्र्यातील ताजमहालात महादजी शिंदेंनी मराठ्यांची घोडी बांधली होती. हाच देदिप्यमान इतिहास आग्रा येथून पुन्हा एकदा जागवायचा असल्याचे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पुरातत्व खात्याने या सोहळ्याला परवानगी नाकारली होती. त्याविरोधात विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर आपल्या बाजूने निकाल घेतला. राज्य सरकार सहआयोजक असल्याने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निकाल कोर्टाकडून मिळवला.
पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती
विनोद पाटील यांनी विनंती केल्यानंतर राज्य सरकार देखील सहआयोजकपद स्वीकारण्यास तयार झाले. आता यंदाही शिवजयंतीचा कार्यक्रम आग्र्यात धुमधडाक्यात साजरा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विशेष अतिथी छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.