पुणे – पीएमपीच्या ताफ्यातील १०० बस स्क्रॅप झाल्याने संचलनातून बाहेर पडल्या आहेत. परिणामी बस संख्या कमी झाली आहे. संचलन नियोजनानुसार मार्गावर बस पाठविताना अधिकाऱ्यांची कसरत होत आहे. नवीन बस खरेदी केंव्हा, स्क्रॅप होण्याअधी स्व-मालकीसह ठेकेदाराच्या बस ताफ्यात दाखल होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. नवीन बस वेळेत आल्या नाही तर शहरातील संचलनाचे वेळापत्रक कोलमडू शकते.
पुणे परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील स्वमालकीच्या ३२४ बसला १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. तर, ठेकेदाराच्या २६६ बसचा करारानुसारचा कालावधी मे महिन्यापर्यंत संपणार आहे. सध्या, ५९३ बस खूपच जुन्या झाल्यामुळे ब्रेक डाऊनचा त्रास वाढला आहे. दरम्यान, मे २०२४ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात नव्याने ५०० पेक्षा अधिक बस येणार असून त्याची खरेदी प्रक्रियाही सुरू झाल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मात्र, सध्या पीएमपीच्या ताफ्यातील १०० बस स्क्रॅप झाल्यामुळे काही डेपोतील संचलनात बसच्या फेऱ्या पूर्ण करताना अधिकाऱ्यांची कसरत होत आहे. ज्या मार्गावरील बस स्क्रॅप झाली, त्या मार्गावर दुसरी बस पाठविण्यासाठी अन्य डेपोतून बस मागविल्या जात आहेत. तर, उपलब्ध बससंख्येतून अधिक फेऱ्या मारण्यात येत असल्याने अधिकाऱ्यांसह चालक आणि वाहकांची सध्या कसरतच सुरू आहे.
दरम्यान, आता केवळ १०० बस स्क्रॅप झाल्या असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत टप्याटप्याने २०० ते ३०० बस स्क्रॅप होणार आहेत. यामध्ये पीएमपी स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसचा समावेश आहे. मात्र, या बस वेळेत आल्या तर ठीक अन्यथा बस संख्येचा मोठा तुटवडा झाल्यास त्याचा परिणाम संचलनावर होणार आहे. परिणामी, महत्त्वाच्या बसथांब्याचा विचार करता प्रवाशांना किमान अर्धा ते एक तास बसची वाट पाहावी लागणार.
“शंभर बस स्क्रॅप झाल्यानंतर खासगी कंपन्याकडून बस घेण्यात आल्या असून पीएमपीच्या स्वमालकीच्या बस ८० टक्के मार्गावर सोडत होते. त्याचे प्रमाण वाढवून ९० टक्के बस मार्गावर सोडत आहे. दरम्यान, जीसीसी कंपंनीचे बस खरेदीचे टेंडर अंतीम टप्यात असून पीएमपीच्या स्वमालकीच्या १०० बस खरेदीबाबत दिलेल्या टेंडरसाठी अर्ज न आल्यामुळे पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.” – नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे