पिंपरी – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे पडसाद आता पिंपरी-चिंचवड शहरातही उमटू लागले आहेत. संपूर्ण शिवसेनाच दोन गटांत विभागल्याने शहरातील काही माजी नगरसेवकांची अडचण झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही जणांकडून उद्धव ठाकरे यांना जाहीर समर्थन दिले जात असले तरी एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असलेल्या काही माजी नगरसेवकांची भूमिका गुलदस्त्यात असल्याचे पहावयास मिळत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाची अस्वस्थता वाढू लागली आहे.
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात राजकीय नाट्यास सुरुवात झाली. शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनीच बंड घडवून आणल्याने त्यांच्या गटात सध्या सेनेचे चाळीसहून अधिक आमदार सहभागी झाले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या गटात सहभागी होणारे वाढत असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने संपूर्ण शिवसेनाच दोन गटांत विभागली आहे.
सत्तानाट्यात काय होणार यापेक्षा शिवसेनेचे काय होणार?
याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच निष्ठावंत शिवसैनिकांनी बंडाखोरांच्या विरोधात आंदोलने करून आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. या आंदोनाचे पडसाद शहरात उमटणार हे निश्चित होते. आणि घडलेही तसेच मात्र शिवसेनेतील एकीचे दर्शन मात्र दिसून आले नाही. शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक उपस्थित राहतील, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र तसे घडले नाही. खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजिव विश्वजीत बारणे यांनी उपस्थिती दर्शविली एवढीच या आंदोलनाची दखल घ्यावी इतकी घडामोड म्हणावी लागली. त्यानंतर आकुर्डी येथे महिला आघाडीच्या वतीने सुलभा उबाळे यांनी आंदोलन केले. व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही राहणार असल्याचे सांगितले.
या आंदोलनाकडेही बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. तर त्याच दिवशी माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी चिंचवडगावातील चापेकर चौकात आंदोलन करून आपला सवता सुभा मांडला. या आंदोलनाकडेही माजी नगरसेवकांनी पाठ फिरविल्यामुळे शहरातील नगरसेवक कोणत्या गटात हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेमध्ये एवढी मोठी फूट पडल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिकांच्या आंदोलनात सेनेचा तो करारी बाणा दिसला नसल्याची चर्चा शहरामध्ये सुरू झाली. त्यामध्येच पिंपरी चिंचवड महापालिकेतील सचिन भोसले सोडले तर बाकी नगरसेवकांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. नऊ माजी नगरसेवकांपैकी आठ नगरसेवकांनी याबाबत आपली कोणतीही भूमिका मांडलेली नाही. तर ते कोणत्याही आंदोलनात सहभागी झालेत नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेली आंदोलने देखील गटा-तटाने झाल्यामुळे शहर शिवसेनेतील दुफळी पुन्हा एकदा समोर आली आहे.
शहरप्रमुखांकडून सारवासारव
शहरातील नगरसेवकांचा आंदोलनामध्ये नसलेला सहभाग आणि गटा-तटाने होणाऱ्या आंदोलनावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांना विचारले असता त्यांनी यावर सारवा-सारव केली. भोसले म्हणाले, मी वारीमध्ये असल्याकारणाने शहरातील शिवसेनेचे शाखाप्रमुख व पदाधिकाऱ्यांना आपल्या आपल्या पद्धतीने निदर्शने करण्यास सांगितले होते. त्यानुसार शहरातल्या काना-कोपऱ्यामध्ये आंदोलने सुरू आहेत. नगरसेवकांना देखील याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र काही नगरसेवक वारीमध्ये होते. तर काहींच्या वैयक्तिक कामामुळे ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत. पिंपरी चिंचवड शहरातील कोणीही शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने नाही. आम्ही शिवसेनेच्या कठीण काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहणार आहोत.
शिंदेंसोबत जवळीक
राज्यात सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही नगरसेवकांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळीक निर्माण झाली होती. हीच जवळीक शिवसेनेच्या फसलेल्या आंदोलनामागे असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे नऊपैकी आठ माजी नगरसेवक आंदोलनाकडे न फिरकणे हा देखील कळीचा मुद्दा बनला आहे. हे माजी नगरसेवक कोणती भूमिका घेतात यावरच शिवसेनेचे शहरातील भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.