पुणे/कात्रज – शहराच्या दक्षिण भागातील कात्रज घाटाखालील भिलारेवाडी गाव परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक नर जातीचा बिबट्या अडकला असता तरी आणखी दोन बिबटे फिरत आहेत. गेली दिड ते दोन महिन्यांपासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या गुंगारा देत फिरत आहे.
भिलारेवाडी गाव परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पिंजरे लावले होते. त्यापैकी एका पिंजऱ्यामध्ये 11 सप्टेंबरला एक नर जातीचा बिबट्या पकडण्यात आला, त्यानंतरही पिंजरे त्या परिसरात ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात बिबट्याकडून पाळीव कुत्र्यावर हल्ला केला तर शेतकऱ्याच्या बकरीचा फडशा फाडला. ही घटना शेतकऱ्यासमोरच घडल्याने आणखी दोन बिबटे फिरत असल्याचे उघड झाले आहे. या दोन बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला अपयश येत आहे.
भिलारवाडी परिसरातील कै.संतोषदादा धनावडे नगर येथे राहणारे वनसेवक संभाजी धनावडे यांच्या पाळीव कुत्र्यावर त्यांच्या घराच्या आवारामध्ये संध्याकाळी सात-साडेसातच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. तर, बाळू मोटे यांच्या 70 बकऱ्यांचा तांडा अविनाश काशीद यांच्या जागेमध्ये बसविण्यात आला आहे. त्या ठिकाणीही रात्री अडीचच्या सुमारास बिबट्याने हल्ला करीत एका बकरीचा फडशा पाडला. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने एक पिंजरा संतोषदादा धनावडे नगर येथे तर दुसरा पिंजरा भिलारेवाडीच्या मध्यवस्तीत लावला आहे.
भिलारेवाडी परिसरामध्ये आधीपासूनच पिंजरे लावण्यात आलेले आहेत. एक नर बिबट्या पकडण्यात यश आले असून आता मादी व बछडा असण्याची शक्यता असल्याने ती पकडण्यासाठी योग्यरीत्या नियमानुसार पिंजरे लावण्यात येतील. हे बिबटे वडकी पासून भिलारेवाडी पर्यंत प्रवास करत असल्याची शक्यता आहे, तसे निदर्शनासही आले आहे.
– एम. जे. सणस, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे