जोगवडी ते लोणी भापकर रस्त्यावरील स्थिती
मोरगाव – बारामती तालुक्यातील जोगवडी ते लोणी भापकर या दोन गावांना जोडणाऱ्या निकटच्या मार्गाची संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचा उपद्रव वाढल्याने हा मार्ग काटेरी झुडपांचा विळख्यात सापडला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बारामती तालुक्यातील गावांना जोडणारा जोगवडी ते लोणी भापकर हा निकटचा मार्ग समजला जातो. या रस्त्यावरून शेतकरी व्यवसायिक शालेय विद्यार्थी व जेजुरी येथील औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणारे कामगार या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या रस्त्या वरील शिवशंभो नगर, खताळ वस्ती, तुकाई नगर, जोगवडी, लोणी भापकर भागातील नागरिक दळणवळणासाठी या रस्त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर करतात; परंतु संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सध्या या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
या रस्त्याचा असणारे डांबरीकरण सध्या पूर्णपणे उघडले असून सर्व रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या रस्त्यावर काटेरी झुडपांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव झाला आहे. या रस्त्याला काटेरी झुडपांचा विळखा पडल्याने रस्त्यात काटेरी झुडपे की काटेरी झुडपात रस्ता असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या रस्त्यावर वाढलेल्या मोठ्या प्रमाणातील काटेरी झुडपामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले असून संबंधित प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी खताळ वस्ती येथील शिवसेनेचे पदाधिकारी मंगेश खताळ यांनी केली आहे.
———————-