वॉशिंग्टन – आधुनिक काळात जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या स्मार्टफोनचे काही तोटेही समोर आले आहेत. जर सतत दहा वर्षे तुम्ही दररोज किमान 17 मिनिटे स्मार्टफोनचा वापर करत असाल तर तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका जास्त असू शकतो. कर्करोग होण्याची शक्यता 60 टक्के वाढू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हा दावा केला असून नागरिकांनी स्मार्टफोन वापरण्यावर बंधने घालून घ्यावीत असे आवाहनही केले आहे. संशोधकांनी स्मार्टफोन आणि मानवी जीवन याच्याशी संबंधित 46 घटकांचा अभ्यास या संशोधनाच्या दरम्यान केला तेव्हा हा निष्कर्ष समोर आला.
दहा वर्षे दररोज किमान 17 मिनिटे स्मार्टफोनचा वापर करत असाल तर तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका 60 टक्के जास्त असू शकतो असा इशारा त्या संशोधकाच्या निष्कर्षांनी दिला आहे. संशोधन करणाऱ्या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोबाइल सिग्नलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.
अर्थात अमेरिकेतील फुड अँड ड्रग अकॅडमीने मात्र या संशोधनाचा इन्कार केला असून अशा प्रकारचा कोणताही धोका मोबाइलच्या माध्यमातून समोर येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. संशोधकांनी मात्र मोबाइलच्या ऐवजी लॅंडलाइनचा वापर करण्यावर भर दिला आहे.
त्यांनी अमेरिका, स्वीडन, ब्रिटन, जपान, साऊथ कोरिया आणि न्यूझीलंडमधील लोकांवर संशोधन करून हा निष्कर्ष काढला आहे. जगभरात सर्वत्रच मोबाइल फोनचा वापर वाढला आहे. 2011 पर्यंत जगातील 87 टक्के घरात मोबाइल फोन होते 2020 अखेरीस हा आकडा 95 टक्के पर्यंत पोहोचला आहे.
संशोधक टीमचे प्रमुख ज्वेल मॉस्कोबिट्स यांनी लोकांनी मोबाइल फोनचा वापर कमी करावा असे आवाहन केले आहे. वायरलेस उपकरणांमुळे रेडिएशन ऊर्जा अधिक सक्रिय होते आणि तिचा शरीराला त्रास होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ सायन्सने 2018 मध्ये केलेल्या संशोधनामध्येही मोबाइल फोनच्या वापरामुळे जे रेडिएशन तयार होते त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका सूचित केला होता.