टोकियो – जपानच्या नागरिकांचा टोकियो ऑलिम्पिकला असलेला विरोध अद्याप कायम आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांनी स्पर्धेच्या विविध ठिकाणांना भेट दिली तेव्हा विरोधकांनी त्यांना गो बॅक असे नारे देत आपला विरोध दर्शवला.
टोकियो ऑलिम्पिकला येत्या 23 जुलैपासून प्रारंभ होत असून अद्याप जपान सरकार व जपान ऑलिम्पिक संघटना हा विरोध दूर करू शकलेले नाहीत. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जपानच्या सरकारसह आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अजूनही या अडचणी संपलेल्या नाहीत. मागील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. आता त्या जुलै 23 पासून सुरु होणार आहेत. पण त्यापूर्वीच काही स्थानिकांनी या स्पर्धांविरोधात नारेबाजी करुन विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. आंदोलनकर्ते ऑलम्पिक रद्द करण्यासाठी गो बॅक असे नारे देत आहेत.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओए) अध्यक्ष थॉमस बाक थांबलेल्या पंचतारांकीत हॉटेलबाहेर अनेक आंदोलकांनी नारेबाजी केली. ऑलम्पिक होणार नाही, तुम्ही सगळे घरी जा, असे नारे यावेळी दिले जात होते. करोनाचा धोका अद्याप कायम असताना ऑलिम्पिकचे आयोजन करणे आणि त्यासाठी निर्बंध वाढवणे तसेच आणिबाणी जाहीर करणे चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी अडचणींना सामोरे जावे लागेल, असे काही आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
जपानमध्ये कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे ऑलिम्पिक संपेपर्यंत करोना प्रादुर्भाव थांबवण्याकरता अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे आणखी बेरोजगारी वाढेल त्यामुळे या स्पर्धांचे आयोजन आता रद्द करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे टोकियोतील सार्वजनिक ठिकाणांवर सुरु असलेली ऑलिम्पिक क्रीडा ज्योत रॅलीदेखील थांबवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
मिशन सुसाईड
ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी विरोध होण्याची ही पहिली वेळ नसून याआधीही जपानच्या नागरिकांनी ऑलिम्पिक खेळांना विरोध केला आहे. काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाईन सर्धेमध्ये जवळपास 80 टक्के नागरिकांनी ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनाला विरोध दर्शवला होता. तसेच या स्पर्धेमुळे करोनाचा संसर्ग वाढीला लागेल असे व्यक्त करत स्पर्धेचे नामकरण मिशन सुसाईड असे नामकरणही केले गेले आहे. देशातील डॉक्टरांनीदेखील या स्पर्धेबाबत नाराजी दर्शवली होती. आता जपान सरकार, जपान ऑलिम्पिक संघटना तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जपानच्या नागरिकांच्या विरोधाला दूर करत स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणार का हाच प्रश्न निर्माण झाला आहे.