मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार असतानाच अद्यापही आघाडीसह महायुतीकडून जागावाटप ठरले नसल्याचे चित्र आहे. असे असतानाच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून सुरू आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. विश्वसनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेमध्ये रामटेकची जागेवर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) दावा सांगितला आहे. जालना मतदारसंघावरही दोघांचा दावा आहे.
तर वर्ध्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मागितल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कृपाल तुमाने हे रामटेकचे विद्यमान खासदार आहेत. ते शिंदे गटात आहेत. तुमानेंविरोधात आपल्याकडे तगडा उमेदवार असल्याचा ठाकरेंचा दावा आहे. पण अनेक वर्षांपासून रामटेक लढवणारी काँग्रेस हा मतदारसंघ सोडण्यास उत्सुक नाही अशी माहिती समोर येत आहे.
मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचे बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. कारण, येथे सातत्याने भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत. जालन्याची जागा युतीत कायम भाजपनं लढवली. तर आघाडीत काँग्रेसकडे राहिली. आता या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनंही दावा सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर अडचणी वाढल्या आहेत. तसेच ठाकरे गटाने ही जागा लढविल्यास तेथे कोणाला संधी मिळते हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा असतानाच दुसरीकडे शरद पवारांनी कोल्हापुरात याआधीच जागावाटपाबाबत भाष्य केले होते. त्यांना यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील जागावाटप झाले का? याबाबत विचारले असता म्हणाले की, 48 पैकी 39 जागांवर एकमत झाले आहे. उरलेल्या जागावर आम्ही वरिष्ठ बसून निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली होती.