दुधाचे दर लिटरमागे दहा रुपयांनी घटले
मंचर- राज्यासह देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका आंबेगाव तालुक्यातील दूध व्यवसायिकांना बसला आहे. सध्या दुधाचे दर दहा रुपयांनी कमी झाले आहेत. दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण कोलमडले आहे.
आंबेगाव तालुका हा बारमाही बागायती म्हणून ओळखला जातो. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) मध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग नदीद्वारे आणि उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना होत असतो, त्यामुळे येथील शेती बारमाही बागायती झाली आहे. पर्यायाने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर तरकारी पिके, भाजीपाला, फळे यांचे उत्पादन घेत असतो. याबरोबरच दुग्ध व्यवसायही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो; परंतु सध्या राज्यासह देशभरात करोना व्हायरसच्या धास्तीमुळे लॉकडाऊन असल्यामुळे वाहनांची ये-जा होत नाही. पर्यायाने दूध विक्रीवर या सर्वाचा परिणाम झाला आहे.
- खासगी संस्थांकडून दूध घेण्यास टाळाटाळ
इतरवेळी 30 ते 31 रुपये प्रति लिटर असणारे दूध आता 22 ते 25 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. काही खासगी सहकारी संस्था दूध घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही वेळेस नकार देत आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. विविध दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या खाजगी संस्था, कंपन्या आंबेगाव तालुक्यात उभ्या राहिल्या आहेत; परंतु दुधाच्या व दुग्धजन्य पदार्थांच्या प्रमाणात घट झाल्याने अनेक संस्था दूध खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत.महाराष्ट्र सरकारच्या वतीने दूध खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जात आहे; परंतु सर्वच खासगी संस्थांना अनुदान मिळत नसल्याने अनेक संस्था 21 ते 22 रुपये प्रति लिटर दराने दुधाची खरेदी करतात.