आमदार अशोक पवार ः सणसवाडीत 150 बेडचे कोविड सेंटर सुरू
शिक्रापूर (पुणे) -शिरूर तालुक्यामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये देखील कोविड उपचार सुरू आहेत; मात्र सर्व हॉस्पिटलचे शासकीय ऑडिट देखील होणार आहेत. ऑडिट झाल्यानंतर जादा गेलेले पैसे देखील नागरिकांना मिळणार आहेत, म्हणून नागरिकांनी हॉस्पिटलचे बिल जपून ठेवावे, असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या पाठपुराव्यामुळे 150 बेडचे कोविड सेंटर सुरु करण्याचे नियोजन आमदार अशोक पवार व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या कोविड सेंटरचे उद्घाटन नुकतेच कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिक्रापूर व सणसवाडी ग्रामपंचायतच्या वतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतील दोन रुग्णवाहिकांचा देखील लोकार्पण करण्यात आले. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, संचालक आबाराजे मांढरे, सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच नवनाथ हरगुडे, पंडित दरेकर आदी उपस्थित होते.
- शासनाकडे आग्रह धरून शिरूर व न्हावरा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केले. कंपन्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाला सर्व काही करावे लागत आहे. कंपन्यांनी देखील पुढे येणे गरजेचे आहे.
-अशोक पवार, आमदार शिरूर हवेली