नवी दिल्ली – देशासह संपूर्ण जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे जगातील जास्तीत जास्त देश लॉकडाउनच्या स्थितीत आहेत. या बंदच्या काळात मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. यातच देशातील पोस्ट ऑफिस सेव्हिंग बॅंक (पीओएसबी) यांच्यामार्फत जवळपास 34 लाख आणि इंडिया पोस्ट पेमेन्ट बॅंकेच्या आधारे 6.5 लाखाची देवाण घेवाण करण्यात आली आहे. तसेच देशभर सर्व प्रकारच्या इंधनाच्या मागणीतही घट नोंदवली गेली आहे.
या बंदच्या काळात ऑनलाईन औषध कंपन्या आणि ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी ऍमेझॉनने भारतीय पोस्टाचा उपयोग केला असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांने दिली आहे. औषधांसोबत अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात आल्याचे सांगितले. याच काळात आयपीपीबीच्या आधारे 6.5 लाखाची उलाढाल झाली आहे. तर स्पीड पोस्टाच्या मार्फत जवळपास 2 लाख पत्रांचे पार्सल आणि मनी ऑर्डर पाठविण्यात आल्या आहेत. पोस्टाच्या माध्यमातून विविध आर्थिक सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल पोस्टाची सुविधा आणि कोरोनाशी संबंधीत परीक्षणाची उपकरणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली आहेत. ही सेवा केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागांसह अन्य देशभरात ही सोय देण्यात आली आहे.
इंधनाच्या मागणीत घट
मार्च महिन्यात सरकारी तेल कंपन्यांची पेट्रोल विक्री 17 टक्के आणि डिझेल विक्री 26 टक्क्यांनी घसरली आहे. “रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार करोनाचा प्रभाव आणि देशातील लॉकडाउनमुळे पेट्रोल व डिझेलच्या मागणीत मोठया प्रमाणात घट झाली आहे.
देशातील किरकोळ इंधन आउटलेटसमध्ये तीन सरकारी कंपन्या आहेत. त्यात इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांचे जवळपास 90 टक्के समभाग आहेत. मार्च महिन्यात 19.4 लाख टन पेट्रोल आणि 49.8 लाख टन डिझेलची विक्री झाली आहे. विमान उड्डाणे बंद असल्याने आणि त्यात लॉकडाउनचा काळ सुरु असल्याने हवाई इंधन विक्री 33 टक्क्यांनी घटून 45 लाख टनावर पोहोचली आहे. दुसरीकडे एलपीजीची विक्री मार्चमध्ये 1.7 टक्क्यांनी वधारुन 23 लाख टनावर पोहोचली आहे.