असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटची मागणी
पुणे – पोलिसांनी भाडेकरु संदर्भात ऑन लाईन पध्दतीने स्वतंत्र यंत्रणा राबवावी अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट संघटनेने केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) अशोक मोरावळे यांची भेट घेतली. सध्या महसूल खात्यासोबत ऑनलाईन भाडेकरारात पोलिस व्हेरिफिकेशनची सोय करण्यात आली आहे. मात्र मागील काही दिवसांत अनेक बोगस भाडेकराराची प्रकरणे पुढे आल्याने ही मागणी करण्यात आली आहे
यासंदर्भात सविस्तर असे की, मागील वर्षी पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन भाडेकरारातच करण्याची सेवा महसूल व पोलीस खात्याने संयुक्त पद्धतीने राबवण्याची प्रक्रिया सुरू केले होती. त्यात दोन्ही खात्याकडून भाडेकरारात पोलीस व्हेरिफिकेशनचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही व त्याची पोहोच कोणी द्यायची हा संभ्रम गेली एक वर्ष सुरू आहे. वाहन खरेदी ,सोसायटीमध्ये प्रवेश तसेच पासपोर्टसाठी सर्वसामान्याची मोठी पंचाईत झाली आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वी विमान नगर येथे बनावट ऑनलाईन भाडेकराराने नवीन दुचाकी रजिस्टर्ड केल्याची तक्रार घरमालक मॉरिस पॉल ह्यांनी नोंदवली आहे. त्यांच्या घरात कधीही भाड्याने न राहिलेल्या पवन नंदलाल वार्यांनी (रा सिध कॉलोनी जळगाव) ह्याने बोगस ऑनलाईन भाडेकराराच्या साहाय्याने गाडी रजिस्टर्ड केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता आहे. यामध्ये खोटे पोलीस व्हेरिफिकेशन, भाडे करारासाठी वापरलेले सरकारी बनावट शिक्के , गाडीचा वापर कोणत्या गुन्हेगारी स्वरूपासाठी केला आहे का ? अश्या गंभीर स्वरूपाच्या बाबी स्पष्ट दिसत आहेत. यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
मुद्रांक विभागाचा कोणतेही नियंत्रण नसल्याने ओपन पोर्टल वरून पीडिएफ व फोटोशॉपचा वापर करून बोगस ऑनलाईन भाडेकरार होत आहेत. यामुळे भाडेकरुच्या व्हेरिफिकेशनसाठी पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी ह्यांनी पत्रात म्हंटले आहे.