पिंपरी – नागपूर, परभणी, कोल्हापूर येथे लागलेल्या आगीचे कॉलही पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास येत आहेत. एवढ्या लांब मदतीला जाणे शक्य नसल्याने शहरातील अग्निशामक अधिकारी जवळच्या अग्निशामक केंद्राचा क्रमांक देतात.
मात्र प्रत्येकवेळी जवळच्या अग्निशामक केंद्राचा क्रमांक पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाकडे असेलच असे नाही. अशा वाढत्या कॉलमुळे अग्निशामक दलाची डोकेदुखी वाढली आहे.
पिंपरी चिंचवड शहरापासून नागपूर 720 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तेथून पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास आग लागल्याची वर्दी नागरिक देतात. कदाचित तांत्रिक चुकीमुळे किंवा पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचा मोबाइल क्रमांक डायल केल्यामुळे हा प्रकार घडत असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र नागपूर शिवाय परभणी, कोल्हापूर येथूनही आगीची वर्दी देणारे कॉल येत असल्याने अग्निशामक दलाची डोकेदुखी वाढली आहे.
वर्दी दिल्यावर फोन बंद
दिवाळीमध्ये चिखलीमध्ये आग लागल्याची वर्दी एका नागरिकाने पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास दिली. त्यानुसार तीन बंब चिखलीकडे रवाना झाले. मात्र ज्या व्यक्तीने फोन केला त्याने आपला फोन बंद करून ठेवला. यामुळे आगीचे ठिकाण शोधायचे कसे, किंवा संबंधित व्यक्तीने खोटी महिती दिली का, असाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आग छोटीशी असल्याने ती शमविण्यात आल्याचे एका नागरिकाने सांगितल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
सोलापूरच्या मनोरुग्णाकडून दिवसाला 50 फोन
सोलापूरच्या एका मनोरुग्ण मुलीकडून दिवसाला तब्बल 50 हून अधिक कॉल येत होते. यामुळे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्या मुलीच्या आईचा मोबाइल क्रमांक मिळविला. मात्र आपल्या मुलीच्या मोबाइलमध्ये बॅलेन्स नसल्याने ती फोनच करू शकत नाही, असा दावा केला. मात्र अग्निशामक अधिकाऱ्यांनी बॅलेन्स नसतानाही 101 क्रमांकावर फोन करता येतो, असे पटवून सांगितल्यानंतर त्या मुलीचा फोन आईने काढून घेतला.
खिशातून लागतो इमरजन्सी नंबर
एक आठवड्यापूर्वी शहरातील एका वृद्धाचा वारंवार अग्निशामक दलास फोन येत होता. फोन करणारी व्यक्ती मित्र मंडळींशी गप्पा मारताना ऐकू येत होती. अखेर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला फोन करून तुम्ही अग्निशामक दलास का फोन करतात, याबाबत विचारले. मात्र आपण फोन करीत नसल्याचे सांगितले. सदर वृद्ध व्यक्तीच्या खिशात फोन असताना इमरजन्सी क्रमांक डायल होत असून त्याचा फोन येत असल्याचे दिसून आले.
यापूर्वी मोबाइलवरून अग्निशामकच्या 101 क्रमाकाला केलेले फोन पुणे अग्निशामक दलास जात होते. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून आता शहरातून 101 क्रमांक डायल केल्यावर मुख्य अग्निशामक केंद्रात फोन लागतो. मात्र शहरातील काही नागरिकांनी अग्निशामक दलाचे मोबाइल क्रमांक सेव्ह केले असल्याने ते बाहेरगावी गेल्यानंतर त्यांनी अग्निशामक दल म्हणून मोबाइल क्रमांक डायल केल्यावर तो फोन आपल्या अग्निशामक केंद्राकडे लागतो.
– नऱ्होना थॉमस, वायरलेस विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
अग्निशामक दलाची सूचीच उपलब्ध नाही
राज्यात 36 जिल्हे असून त्यामध्ये विविध महापालिका,नगरपालिका, नगरपंचायती आहेत. यापैकी सर्वच महापालिकांमध्ये अग्निशामक दल आहे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी, एमआयडीसी असलेल्या बहुतांश ठिकाणी, नगरपालिकांमध्ये अग्निशामक दल आहे. मात्र याबाबतची एकत्र माहिती आणि फोन क्रमांक असलेली सूची राज्य शासनाच्या संकेत स्थळावर अथवा कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे इतर ठिकाणाहून फोन आल्यास जवळच्या अग्निशामक केंद्राचा क्रमांक देता येत नाही किंवा नागरिकांना संकेतस्थळावरून तो मिळविताही येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने अग्निशामक केंद्रांची एक सूची तयार करावी, अशी मागणी होत आहे.