पुणे – शहरात बुधवारी करोनाचे नवे 232 रुग्ण आढळले आहेत. यामुळे कमी झालेला बाधितांचा दर 4.93 टक्क्यांवर गेला आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 404 झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
नाताळच्या सुट्ट्या, हवामानातील बदल, पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर होणारी गर्दी, लग्न आणि अन्य समारंभ, सुरक्षेच्या नियमांना फासलेला हरताळ या सगळ्यांचा परिणाम म्हणून बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या सध्या 1 हजार 218 इतकी झाली असून, दिवसभरात 83 जण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात आज एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही, मात्र शहराबाहेरील 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने बुधवारी दिवसभरात 6 हजार 600 जणांची करोनाची चाचणी झाली.
ओमायक्रॉनचा इफेक्ट आहे किंवा कसे पुढील काही दिवसांमध्ये समजेल. पाचच्या पुढे बाधित दर गेला तर त्याबाबत खात्रीशीरपणे सांगता येईल. संख्या जर वाढली तर ओमायक्रॉनची शक्यता नाकारता येत नाही. सध्या चाचण्यांची संख्याही वाढवली आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा