जिल्ह्यातील करोनाबाधित दर 8 टक्क्यांजवळच!
पुणे – जिल्ह्यातील शहर हद्दितील करोनाबाधित दर पाच टक्क्यांच्या आत आला. मात्र, ग्रामीणमधील बाधित दर अजूनही सात टक्क्यांच्या खाली येत नाही. उलट मागील आठ दिवसांपासून बाधित दर पुन्हा वाढू लागला असून, ग्रामीणमधील बाधित संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला. मागील महिनाभरात पुणे ग्रामीणमध्ये जवळपास 17 हजारांनी बाधित संख्या वाढली आहे.
पुणे ग्रामीणमधील बाधित संख्या 3 लाख 1 हजार 190 वर पोहचली आहे. त्यामध्ये ग्रामीण कार्यक्षेत्रात 2 लाख 43 हजार 17 तर, नगरपरिषद कार्यक्षेत्रात 58 हजार 173 बाधित संख्या आहे. त्यामध्ये आतापर्यंत 2 लाख 90 हजार 377 करोनामुक्त झाले आहेत.
ग्रामीणमधील करोनामुक्तीचे प्रमाण 96.41 टक्के इतके आहे. तर आतापर्यंत एकूण बाधित दर 20.93 टक्के आहे. दरम्यान, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात आरोग्य विभागाला यश आले. मात्र, ग्रामीणमध्ये बाधित दर नियंत्रणात आणण्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे बाधित दर साडेसात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान आहे.
आजही ग्रामीणमध्ये 633 करोनाबाधित सापडले. करोनामुळे ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 696 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ग्रामीणमध्ये 3 हजार 686 तर, नगरपरिषद हद्दित 1010 जणांचा मृत्यू झाला आहे.