वॉशिंग्टन : कोरोना विषाणूंच्या बाधेमुळे जगभरात आठ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे दोन लाख जणांना याची बाधा झाली आहे. हा विषाणू हवेत काही तास जिवंत राहू शकतो. तर पृष्ठभागावर तो काही दिवसांपर्यंत जिवंत रहात असल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बाधितांच्या खोकल्यातून आणि संपर्कातून या विषाणूची बाधा कशी पसरली हे स्पष्ट होत आहे.
सार्स सीओव्ही-2 या विषाणूंमुळे कोरोनाची बाधा होते. तो हवेत तीन तासांपर्यंत जीवंत राहू शकतो. तांबे धातूच्या पार्श्वभागावर चार तास, कार्डबोर्डवर 24 तास, प्लास्टिक आणि स्टिलवर दोन ते तीन दीवस राहू शकतो, असा अहवाल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (एनईजेएम)मध्ये प्रसिध्द झाला आहे.
सार्स सीओव्ही-2 ची तुलना सार्सला कारणीभूत असणाऱ्या सार्स -सीओव्ही या विषाणूशी करण्यात आली. सार्समुळे 2002-03 मध्ये आठ हजार जण मरण पावले होते. मात्र 2004 पासून सार्सचा एकही रुग्ण आढळला नाही. सार्सच्या विषाणू एवढाच काळ कोरोनाचे विषाणू हवेत जीवंत राहू शकतात. मात्र रुग्णांचा निकटचा सहवास टाळून आणि विलगीकरणाची प्रक्रिया करूनही कोरोनाची अनेक देशात सामुहिक संक्रमण झाले आहे. सार्सबाबत असे घडले नव्हते.
कोरोनाचा प्रसार ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत अथवा सौम्य प्रमाणात असतात. त्यांच्याकडून या विषाणूंची बाधा अधिक प्रमाणात होते, असा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील एका अभ्यासाने या इशाऱ्याला दुजोरा दिला आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामामगे पाच ते 10 जण बाधीत आहेत. मात्र त्यांच्यात सौम्य लक्षणे अथवा लक्षणे दिसली नाहीत. चीनमध्ये बंदी आदेश 23 जानेवारीला लागू करण्यात आले त्यापुर्वी 79 टक्के बाधितांना बाधा कोणापासून झाली हे समजत नव्हते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.