दोन आरोपी अटकेत : मृतदेहाची घोडनदीत विल्हेवाट
रांजणगाव गणपती -कारेगाव येथून अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन आरोपीना अटक केली असून त्यांनी खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दादाभाऊ नवले (वय 51, रा कारेगाव, ता. शिरूर), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विनोद जाधव (वय 29, रा. बाभुळसर), सनी जाधव (वय 19, रा. रांजणगाव गणपती) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दादाभाऊ भाऊसाहेब नवले यांचे (दि. 10) मार्च रोजी संध्याकाळी पावणेपाच वाजता कारेगाव येथील मशिदीपासून कारमधून अपहरण केल्याची फिर्याद अक्षय नवले याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. कारेगाव येथील मशिदीजवळून अल्टो कारमधून मंगळवारी (दि. 10) रोजी पावणे सहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते.
गुन्ह्याचे गार्भीय लक्षात घेऊन रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कारेगाव ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन तपास सुरू केला. आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी मयत दादाभाऊ नवले यांना मारहाण करून पट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह शिरुर शहराजवळील घोडनदी पात्रातील पाण्यात टाकून दिला, अशी कबुली दिली.
घोडनदी पात्रात शोध घेतला असता मयत दादाभाऊ नवले यांचा मृतदेह मिळाला. त्यामुळे गुन्हा उघडकीस आला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौड विभागाच्या उप विभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, नानासाहेब काळे, तुषार पंधारे, संतोष घावटे, अजित भुजबळ, चंद्रकांत काळे, प्रफुल्ल भगत, मंगेश थिगळे, मिलिंद देवरे, उद्धव भालेराव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत.