पुणे – अनैतिक संबंधातून एकोणीस वर्षीय तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर ती पाठीच्या दुखण्याचे कारण सांगून एका रुग्णालयात दाखल झाली. तिने एका बालकाला जन्म दिला. याविषयी कोणाला काहीही न सांगता तिने नवजात बालकाला रुग्णालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिले. ही धक्कादायक घटना नवले पुल रस्ता भागातील एका रुग्णालयात घडली. या प्रकरणी तरुणीच्या विरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणी सिंहगड रस्ता परिसरातील एका वसतीगृहात राहते. अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. दरम्यान, आठ महिने झाल्यानंतर ती पाठीच्या आजाराचे कारण सांगून नऱ्हे परिसरातील एका रुग्णालयात दाखल झाली. पाठ दुखत असून, अशक्तपणा जाणवत असल्याचे तिने रुग्णालयात सांगितले.
गर्भवती असल्याचे तिने रुग्णालयापासून लपवून ठेवले होते. ती रुग्णालयातील एका स्वच्छतागृहात गेली. तिथे तिने बालकाला जन्म दिला आणि काहीही विचार न करता तिने नवजात बालकाला खिडकीतून बाहेर फेकून दिले. या घटनेत नवजात बालकाचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करत आहेत.