नांदेड – गेल्या वर्षी 14 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड शहरातील सरपंच नगर भागात शरद कुऱ्हाडे नावाच्या इसमाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात सापडला होता. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात कुऱ्हाडे यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र ही आत्महत्या नसून व्यसनाधीन झालेल्या पित्याला कंटाळलेल्या मुलाने आपल्या आईच्या मदतीने सुपारी देऊन पित्याचा खून केल्याचे आता दीड वर्षांनंतर तपासात निष्पन्न झाले आहे.
शवविच्छेदनानंतर अधिक तपासणीसाठी अहवाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात कुऱ्हाडे यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांचे 14 वार होते.
यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुन्हा चौकशीला सुरुवात केली. त्यात शरद कुऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा बनाव उघड झाला. शरद कु-हाडे दारूच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते पत्नी आणि मुलाला मारहाण करायचे. दारुसाठी पैसे मिळवण्यासाठी त्यांनी घरही विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पत्नी अश्विनी कुऱ्हाडे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाने हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली.
हत्येची सुपारी घेणारी मुलेही खून झालेल्या व्यक्तीच्या मुलाचे अल्पवयीन मित्र निघाले. पोलिसांनी पत्नी अश्विनी कुऱ्हाडे, सध्या 18 वर्ष वय असलेल्या तीन अल्पवयीन मुलांसह एकूण सहाजणांना अटक केली आहे.