नवी दिल्ली – हरियाणातील कर्नाल येथे चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे संशयित पंजाब येथून महाराष्ट्रातील नांदेडकडे निघाले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौघांची आता गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू असून त्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला गेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले तिघे पंजाबच्या फिरोजपूर येथील असून चौथा व्यक्ती लुधियानाचा रहिवासी आहे. एका इनोव्हा गाडीतून ते दिल्लीमार्गे महाराष्ट्रात दाखल होणार होते. दरम्यान, घातपाताच्या या कारस्थानामागे पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी हविरंदर सिंह रिंडा याच्याशी चौघांचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली स्फोटके निकामी करण्याचे काम बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाकडून सुरू होते.
आयबीच्या अलर्टनुसार बसताडा टोलनाक्यावर नाकेबंदी करण्यात आली होती. आजूबाजूच्या जिल्ह्यांतील सुरक्षा यंत्रणांना देखील अलर्ट करण्यात आले होते. कर्नालमध्ये नाकेबंदी करण्यात आली होती. त्या टोलनाक्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. सुरक्षा यंत्रणाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दहशतवादी हे बब्बर खालसा संघटनेशी संबंधित आहेत
इनोव्हा गाडीतून तीन भूसुरुंग, बंदूक आणि काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. गेल्याच आठवड्यात पंजाबच्या पतियाळा येथे शिवसेनेने खलिस्तानविरोधी मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. खलिस्तानविरोधी घोषणा दिल्याने काही जण शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरले होते व त्यामुळे वातावरण तापले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असताना हे संशयित दहशतवादी पोलिसांच्या हाती लागले आहे.