आंबेगाव बुद्रुक, दि. 10 (प्रतिनिधी) – आंबेगाव खुर्द, नऱ्हे, आंबेगाव पठार, राजे चौक, जांभुळवाडी परिसरातील गणेश भक्तांनी पारंपरिक वस्त्र परिधान करीत वाद्यांच्या गजरात, नाचत-गाऊन गणरायाचे विसर्जन केले. जांभूळवाडी तलाव परिसरात बाप्पांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तलावाच्या शांत वातावरणात गणेशाच्या आरतीचे सूर मिसळत होते.
सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्ती, सोसायटीतील गणेशमूर्ती व सार्वजनिक मंडळे यांनी विसर्जन करण्यासाठी आंबेगाव बुद्रुक गायमुख चौकात व जांभुळवाडी तलाव परिसरात गर्दी केली होती. अनेकांनी पायी चालत जाऊन बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन केले. जांभूळवाडी तलावावर सामाजिक ट्रस्ट व महापालिकेने श्रीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. श्रीच्या आरतीसाठी टेबल, पिण्याचे पाणी, बॅरीगेट्स, स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे व दत्तनगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. परिसरातील अनेक राजकीय व सामाजिक मान्यवरांनी दिवसभर या ठिकाणी भेटी दिल्या.