पुणे, दि. 10 (प्रतिनिधी) – पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शिरपेचात मानाचे स्थान असलेले नारायण- सदाशिव पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळ, ही दोन्ही मंडळ गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 2015 पासून एकत्र आली. यंदा सलग 8व्या वर्षीही परंपरा कायम राखण्यात आली. श्री गजानन मंडळाचे अध्यक्ष राकेश गाडे पाटील आणि श्री गरूड गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुंजीर यांनी केलेल्या नियोजनबद्ध विसर्जन मिरवणुकीत महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, असा जयघोष करत विसर्जन मिरवणुकीत समाजाला एक नवी दिशा देणारे हे दोन्ही मंडळांनी सामाजिकतेचे भान ठेवले आहे. 2015 मध्ये पुणे शहराचे तत्कालीन पुणे शहर पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्तांनी केलेल्या आवाहनानुसार येथील दोन्ही मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याचा मानस केला आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग 8व्या वर्षी ही दोन्ही मंडळे एकत्रित मिरवणूक काढत असल्याने मिरवणूकीचा प्रशासनावरील ताण कमी झाला.
दोन गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याने दोन मंडळांचे ढोलताशांचे पथक एकत्र राहिले, तसेच दोन श्री गणरायांची मूर्ती एकाच गाडीवर असल्यामुळे दोन मंडळांमधील अंतर कमी होणार असून दोन्ही मंडळांचा खर्चावरील त्राण देखील कमी झाला. दोन्ही मंडळांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा कायम जपली असल्याचे गाडे आणि कुंजीर यांनी सांगितले.