#प्रभात_दीपोत्सव_२०२० : लोकसंस्कृतीतील स्त्री लावण्य प्रतिमा

– डॉ. राजेंद्र माने


लोकसाहित्यामध्ये स्त्रियांनी आपल्या साहित्याचा सुंदर ठसा उमटविला आहे. त्यांची नावे ज्ञात नाहीत. पण त्यांनी निर्मिलेले साहित्य मौखिक परंपरेने शाबीत राहिले. नंतर आता लिखित स्वरूपात ते उपलब्ध आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे. त्यात वेगळे लावण्य आहे. हे साहित्य निर्माण करणाऱ्या या स्त्रिया एका अर्थाने लोक साहित्यातील स्त्री लावण्य प्रतिमाच आहेत.

देवदेवतांचे लोकसाहित्यात मानुषीकरण करून त्यांना सर्वसामान्य लोकमानस बनवल्याचे खूपदा दिसून येते. त्यामुळे त्यांना मानवी सुखदुःखे भोगावी लागली आहेत. त्यांच्यात उमटलेले राग लोभ मग या प्रतिभावान स्त्रियांनी त्यांच्या ओव्यातून गीतातून मांडले आहेत. त्यात एक वेगळे सौंदर्य दडलेले आढळते.

रुक्‍मीणी जेंव्हा विठ्ठलाकडे फक्‍त नवरा म्हणून पहाते याचा विचार जेंव्हा होतो तेंव्हा मग विठ्ठल आणि जनाबाई या नात्याकडे लोकसाहित्य एका वेगळ्या नजरेने पहाते. इथे रुक्‍मिणी फक्‍त एक पत्नी असते. तिला जनीत विठ्ठलाची प्रेयसी दिसायला लागते. तिच्या मनात जनी विषयी मत्सर निर्माण व्हायला लागतो. आणि सर्वसामान्य स्त्री ज्या पद्धतीने नवऱ्याकडे तक्रार करेल त्या पद्धतीने ती मनातले भाव व्यक्त करते. ते ज्या पद्धतीने मांडले आहे ते सुंदर आहे. त्यात भाषा-लावण्यासह भाव-लावण्य आहे. 

इठ्ठलाचे पाय रुखमिन मर्जीती लोण्यानं
खरं सांगा मही आण, जना तुमची कोण?
इठ्ठल मनितो रुखमिनी नको पाप धरू
आपल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरु
रुखमिन मनिती देवा तुम्हा लाज थोडी
गादी फुलाची सोडून वाकळंची काय गोडी
रुखमिन मनिती देवा तुमचा येतो राग

तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचा डाग यातील रुक्‍मिणी आणि जनाबाई व विठ्ठल या नात्यातलं वेगळं सौंदर्य आहे. हा एक वेगळा नातेशोध आहे. यात वापरलेल्या प्रतिमा वेगळ्या आहेत रुक्‍मिणीला फुलाची गादी तर जनाबाई ला वाकळ म्हटलं आहे. विठ्ठलाचे धोतराला जनीच्या काजळाचा डाग कसा लागला यानं रुक्‍मिणी धास्तावली आहे. आपल्या आणि विठ्ठलाच्या नात्यात अंतर पडणार नाही ना याची तिला भीती आहे. हे सगळं यात तरलतेनं व्यक्त झालं आहे.

राम-सीता नाते… राम-सीता या नात्याचा शोध ही लोक साहित्यात त्याच्या नजरेनं घेतला गेलाय. इथं हे सर्व आजमावून घेण्याच्या त्याच्या फुटपट्टया वेगळ्या आहेत. ते देव असले तरी पृथ्वीतलावर माणूस म्हणून जन्म घेतल्यावर त्यांच्या वागण्याकडे त्या दृष्टीनेच लोकमानस पहाते. वागण्यातले चूक बरोबर चा इथला हिशोब वेगळा आहे. 

राम देव म्हणून श्रेष्ठ असला तरी नवरा म्हणून तो किती चांगला होता, याचा विचार होतो. मग मात्र सीतेच्या तुलनेनं त्याच्या नवरेपणाचा विचार होतो. रामानं कोण्या धोब्यानं म्हटलं म्हणून सीतेचा त्याग केला आणि तेही केंव्हा तर सीतेला दिवस गेलेले असताना. इतकंच काय रावणाकडून परत आल्यावर सुद्धा सीतेने अग्निपरीक्षा दिली होतीच. तरीसुद्धा रामानं तिचा त्याग केला. ही गोष्ट लोकसाहित्यातील स्त्रिला रुचलेली नाही. म्हणून मग तिच्या लेखी राम हा सीतेच्या तुलनेनं बरोबरीचा नाही. ती म्हणते…

राम म्हणू राम
नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई
राम धाकल्या दिलाचा.

रामाचं दिल सीतामाई इतकं विशाल नाही. कुणी काही सांगितलं म्हणून सीतेविषयी रामाचं शंका घेणं रास्त नाही असं त्याग्रामीण स्त्रिला वाटते. खरं तर अंकुश रामायण, जो लोक साहित्याचाच एक भाग आहे त्यातही एक सीतेबद्दल कथा येते.

सीता रावणाकडून परत आले नंतर अयोध्येत एका निवांत क्षणी कैकयी सीतेला विचारते, इतके दिवस तू लंकेत होतीस तू रावणाला खूप वेळा पाहिले असशील. कसा दिसायचा रावण? शेवटी कैकयीच ती. तिच्या बोलण्यामागचा कावा सीतेला काय कळणार!

सीता म्हणाली, मी रावणाचा चेहरा कधी पाहिलाच नाही. मी कधी नजर उंचावून त्याला पाहिले नाही. माझी नजर फक्‍त त्याच्या पावलावरच असायची.

त्यावर मग कैकयी म्हणते, मग निदान त्याच्या पावलांचे चित्र तरी आम्हाला काढून दाखव.
सीतेने रावणाच्या पावलाचे चित्र काढून दाखवले. नंतर सीतेच्या अपरोक्ष कैकयीने तिच्या कल्पनेने रावणाचे चित्र पूर्ण केले. आणि नंतर कैकयी रामाला म्हणाली सीता लंकेवरून परत आली पण तिच्या मनात अजूनही रावण आहेच. हे बघ तिनेच हे रावणाचे चित्र काढले आहे.

अशा प्रकारच्या कथाही लोक साहित्यात येतात. ज्या सीता रुक्‍मिणी लोकसाहित्यात येतात त्या त्यांचं वेगळं रूप घेऊन येतात. त्यांचं भोगणं वेगळं असतं. इथे त्या देवी रुप म्हणून येत नाहीत. त्यांचं मानुषीकरण झालेलं असतं.

तुळस आणि लोकसाहित्य
तुळस हीसुद्धा लोकसाहित्यातली वेगळी लावण्य प्रतिमा आहे. खूपदा लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांचा एक वेगळा अनुबंध पहायला मिळता. लोकसंस्कृतीचा ठसा लोकसाहित्यात सापडतो. तुळस ही वंदनीय मानली गेली आहे. तुळस प्रत्येकाचे घराचे अंगणात असते. त्या तुळशीची रोज घरातली स्त्री पूजा करते. तिला हळदीकुंकू वहाते. नमस्कार करते. त्याशिवाय तिचा दिवस चालू होत नाही. या तुळशीचे दरवर्षी कृष्णा सोबत लग्न लावले जाते. तिला चिंचा आवळे बोरे वाहिली जातात. हिरव्या बांगडया अडकवल्या जातात. मंगळसूत्र अडकवले जाते. कृष्णाच्या मूर्ती सोबत तिचे लग्न लावले जाते. मंगलाष्टका म्हटल्या जातात. पण लोकसाहित्याने या तुळशीचे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला आहे.

तुळशी गं बाई
तुला न्हाई नाक डोळे
अशा सावळ्या रुपाला
कसे गोविंद भुलले
तुळशी गं बाई
काय हे तुझं जिणं
गोविंदाच्या संगे
वर्सा वर्साला लगीन.

लोकसाहित्य या स्त्री लावण्य प्रतिमांच्या बाह्यरुपा सोबत अंतर्मनाचा विचार करते. या दैवी स्त्री लावण्य प्रतिमा सोबत लोकसाहित्याने वास्तवातील सर्वसामान्य माणसाचे जगणे जगणाऱ्या स्त्री प्रतिमांचाही तितक्‍याच उत्कटपणे विचार केला आहे.

जात्यावरच्या ओव्या
जात्यावर दळण दळणारी स्त्री सुद्धा त्यापैकीच एक मानावी लागेल . तशी ती श्रमाचे एक प्रतिकही आहे. पहाटे उठून दगडी जात्यावर दळण दळणे इतके सोपे नसते. ते जातं ओढताना ताकद लागते. पण ही स्त्री त्या जात्यालाही मग ईश्‍वराचे रुप देते. आणि म्हणते…

जात्या ईसवरा
तुला वडूनी पाहिलं
मावलीचं दूध
तुझ्या कारनी लावलं
जात्या ईसवरा
जड जाशी दाटयीनी
तुझ्या शिनयीची
आणू सौंगड कुठूयीनी

ही स्त्री ओव्या गाते पण तिची प्रतिभा अचंबित करणारी आहे . त्या काळातली समाजरचना,रीतभात, परंपरा, पुरुषी वर्चस्व, वेगवेगळे नाते बंध, निसर्गाची वेगवेगळी रुप, सासर माहेर हे सगळं या जात्यावरचे ओव्यात सामावलं आहे. या ग्रामीण स्त्रिला व्यक्त व्हावसं वाटतं. ती तिची मानसिक गरज असते.

जोवरी माय बाप,
लेक येऊ द्या जाऊ द्या
आंब्याची आंबराई,
एवढी बाळाला घेऊ द्या
जोवरी मायबाप,
लेकी माहेराची हवा
भाऊ भावजयाचं राज्य
मग अम्मल आला नवा.

आई वडील यांचे नंतर हक्काचे माहेर उरत नाही. ही बाईची वेदना आहे. जात्यावरची ओवी अशा भावभावनांचा आलेख आहे. मूक वेदना वेगवेगळ्या प्रतिक आणि प्रतिमा मधून व्यक्त होत असते.

बंधूजी विचारतो
भैना सासुरवास कसा
सावळ्या बंधूराया
बरम्या लिवून गेला तसा
बंधूजी विचारतो
भैना सासुरवास कसा
चिताकाचा फासा
गळी रुतला सांगू कसा

घरचा सासुरवास जसा असावा तसा म्हणजे ब्रम्हलिखीत आहे पण नव्याने त्रास दिला तर काय करायचं ? इथं “चिताकाचा फासा’ ही उपमा नवऱ्यासाठी येते. अशा अनेक वेगवेगळ्या भावनांचं प्रकटीकरण ही स्त्री ओव्यामधून करत असते.

लावणीची नजाकत
लावणी नाचणारी स्त्री हीसुद्धा एक लावण्य प्रतिमाच आहे. लावणीला स्वतःचा इतिहास आहे. काहींच्या मते “लावण्य’ या नामावरून लावणी असं म्हटलं गेलं आहे. लावणी नृत्य करणारी स्त्री स्वतःचा खास शृंगार करत असते. लावणी म्हणजे फक्त नर्तकीने चाळ बांधून नाचणे नव्हे. लावणी खूप अंगाने विस्तारीत आहे .

लावणीचे बैठकीची लावणी, खडी लावणी, छकडी लावणी, फडाची लावणी असे वेगवेगळे प्रकार बोलीभाषेत वर्णिले जातात. विदर्भात वही नावाचाही लावणीचा प्रकार आहे.

आध्यात्मिक भेदिक लावणी, शृंगारिक लावणी, विविध विषयपर लावणी असेही प्रकार केले जातात.
आध्यात्मिक लावणी ही संताच्या स्फूट रचना, पंथीय वाङमय या परंपरेतून आलेली जाणवते. विश्‍वाचा अर्थ, भक्‍ती, ज्ञान, वैराग्य, आत्मज्ञान यांचे स्वरूप अशा प्रकारच्या लावणीतून सामोरी येते. शृंगारिक लावणीमध्ये कृष्ण गोपींच्या शृंगारिक लावण्या असे प्रकार पहायला मिळतात. बऱ्याच शाहीरांनी अशा रचना केल्या आहेत.

एकेकाळी “पंचकल्याणी लावणी’ व “गंगाघाटची लावणी’ या रचना प्रसिध्द होत्या. लावणी हा प्रदीर्घ अभ्यासाचा विषय आहे. पण लावणी नृत्य करणारी स्त्री व लावणी रचना यात वेगळं लावण्य नक्कीच आहे.
यल्लमा देवीच्या जोगतीणी हेसुध्दा लोकपरंपरेतली एक लावण्य प्रतिमाच आहे.

यल्लमाच्या जगतीणी
डोक्‍यावर यल्लमाचा मुखवटा ठेवलेली टोपली ज्याला “जग’ असं संबोधलं जातं. कपाळावर भंडारा, कुंकू लावलेल्या “जगतीणी’ यल्लमा देवीचं महात्म्य वर्णन करणारी गाणी म्हणत असतात. सोबत चौंडकं नावाचं वाद्य जोगती वाजवत असतो. देवीला नवस बोलून तो पुरा झाला की देवीला मुलगी सोडली जाते. त्यातून देवदासी ही प्रथा निर्माण झाली. या मुलीचं देवाशी लग्न लावलं जातं. त्यावेळी लाल पांढऱ्या मण्याची माळ त्या मुलीच्या गळ्यात घातली जाते. तिला मदर्शन म असं म्हणतात. डॉ .रा. चि. ढेरे यांनी लज्जागौरी मध्ये जगतीणीविषयी एक गीत दिलं आहे.

यल्लु मंगळवारा दिशी,
यल्लु शुक्रवारा दिशी
आली डोंगर उतरूनीया
भंडार इभूतीचा मळवट भरती
वर कुंकवाचा टिळा लेती
माळ, परडी शिक्‍का घेती
यल्लू जोगवा मागती

या जोगतीणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवीचे महात्म्य वर्णन करणारी गाणी म्हणत असतात. लिंब नेसणे सारखा विधी सांगत असतात. मंगळवार व शुक्रवारी जोगवा म्हणून घरोघरी जावून धान्य मागत असतात. लोकसंस्कृतीमध्ये यल्लमाचे उपासक म्हणून जोगतीणीकडे पाहीले जाते. जोगतीण हीसुद्धा वेगळ्या अर्थाने एक लावण्य प्रतिमाच आहे.

वाघ्या-मुरळी
वाघ्या -मुरळी मधील मुरळीसुद्धा लोकसंस्कृतीमधील एक उत्तम लावण्य प्रतिमा आहे. खंडोबाची मुरळी ही खेडोपाडयात सर्वत्र माहिती असते.कंबरेला भंडाऱ्याची पिशवी बांधून वाघ्याच्या दिमडीवर ती नृत्य करत असते. तो खंडोबाचा जागर असतो. खंडोबाची कथा, खंडोबाचे महात्म्य गाण्यातून उलघडून दाखवत असते मुरळीच्या पायात घुंगरू असतात. हातात घंटा घेऊन ती नाचत असते. वाघ्ये हातात तुणतुणे व दिमडी घेऊन मुरळीचे नृत्याला साथ देत असतात. मधुनच भंडारा उधळतात आणि तोंडाने “मल्हार’ “मल्हार’ म्हणतात.

मुरळीची गाणी पाहिली की त्याची बरीचशी रचना लावणी सारखी वाटते कारण त्यातला ठेका व शृंगारपरिपोष शद्बरचना कुठतरी लावणीचा पाया असावा, असे वाटते.

वय सोळा, कोवळी काया, हूडपणात घुंगरू पाया,
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया
पोर बावरी झाली पहा जेजुरीला जाया
नव्या नव्या वाऱ्याने हिचे भारावले अंग,
या अशा वयातच बदलू पाहे ढंग,
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया

यात सोळाव्या वयातल्या तारुण्याचा आविष्कार, शरीरातले घडू पहाणारे बदल आणि मल्हारीच्या भेटीची आतुरता व्यक्त होते. वाघ्या -मुरळीचे गाण्यात मल्हारी -बानू, म्हाळसाची कथा, त्यांची भेट, भांडण, संसार यांची वर्णने येतात. मुळात सवतीची भांडणं हा सगळयांचा श्रवणीय विनोदी विषय. लोक आनंद घेत हसत ही गाणी ऐकतात. 

या सगळ्या लोकसंस्कृती व लोक साहित्यातल्या लावण्यप्रतिमा आहेत. यांचे एक वेगळे सौंदर्य आहे. वेगळे महत्व आहे. लोकसाहित्य म्हणजे एक समुद्र आहे त्यात अनेक रत्ने आहेत. लावण्य प्रतिमा त्यातीलच एक म्हणावे लागेल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.