पिंपरी – करोनामुळे आम्हाला कामधंदा नाही. हातावरचे पोट आहे. बिगारीचे काम कधी मिळते, कधी नाही. पैसे नाही, खायचे वांधे आहेत. आमची कसली आली आहे दिवाळी… ही प्रतिक्रिया आहे कष्टकरी कामगार लक्ष्मण काळे यांची.
करोना प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सध्या राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. दिवाळीसाठी नागरिकांकडून खरेदी सुरू आहे. मिठाई, दिवाळीचा फराळ आदींची देवाणघेवाण केली जात आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे गरीबांची दिवाळी मात्र अद्याप अंधारातच आहे.
पिंपरी येथील उद्योगनगरजवळील मैदानात पाल ठोकून कष्टकरी, कामगारांचे सुमारे 25 कुटुंबीय वास्तव्यास आहेत. त्यातील काही जणांशी संवाद साधला असता दिवाळीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळाला नाही. बिगारी कामगार लक्ष्मण काळे म्हणाले, करोनामुळे आमचा कामधंदा गेला आहे. हातावर पोट असल्याने सुरूवातीला साफसफाईचे काम सुरू केले. आता फुगे विकून त्याच्यावर घर चालवित आहे. सध्या पैसे नाही. दोन वेळचे खायचे वांधे आहेत.
आमची कसली आली आहे दिवाळी. स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या धान्यरूपी मदतीनंतरच आमच्या लेकराबाळांची सोय होत आहे. हुलाबाई काळे म्हणाल्या, मी भांडी घासायची कामे करीत होते. मात्र, सध्या हे काम बंद आहे. घरात कमावणारे कोणी नाही? त्यामुळे दररोजची भाजी-भाकर मिळविणे देखील मुश्किल झाले आहे. लक्ष्मी पवार म्हणाल्या, मी घरोघरी जाऊन घरकाम करीत होते. दिवाळीमुळे हे काम बंद आहे. माझी दोन्ही मुले बिगारी काम करतात. त्यांनाही दररोज काम भेटत नाही. कधी भेटते, कधी भेटत नाही. दिवाळीचा फराळ केलेला नाही.
स्वयंसेवी संस्थांकडून हवायं मदतीचा हात
पुण्यातील भूमी अभिलेख कल्याणकारी संस्थेच्या वतीने या कामगार, कष्टकरी कुटुंबांना तेल, तांदूळ, साखर, डाळ, कडधान्य आदी स्वरुपाची मदत करण्यात आली आहे. विविध स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे केल्यास त्यांची दिवाळी चांगली होऊ शकणार आहे.