कोपरगाव – लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी पीक अप गाडी तालुक्यातील तळेगाव मळे येथील शिवारातील एका विहिरीत कोसळल्याने गाडीतील एका लहान मुलासह सातजण जखमी झाले. त्यातील तिघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सोनार वस्ती येथील अशोक पवार यांचा मुलगा आकाश यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता लग्न होते.
लग्नासाठी चुलत भावासह जवळच्या नातेवाइकांची वऱ्हाडाची पीक अप गाडी सोनार वस्ती येथून सकाळी खुलताबादच्या दिशेने निघाली होती. मुंबई-नागपूर महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील तळेगांव मळे शिवारात असताना वऱ्हाड घेऊन जाणारी पीक अप (एमएच 15 जेसी 1023) गाडीवरील चालक सचिन चव्हाण याचे समोरून येणाऱ्या गाडीला चुकवण्याच्या नादात आपल्या ताब्यातील गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली.
सकाळी साडेनऊच्या दरम्यान अचानक मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. वऱ्हाडाची पीकअप विहिरीत गेल्याने गाडीतील आठ जणांचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात आले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तातडीने बचावकार्य सुरू झाले आणि काही क्षणात गाडीसह गाडीत अडकलेल्यांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढल्याने कोणीही पाण्यात बुडाले नाही, तसेच विहिरीचा गोलाकार लहान असल्याने गाडी विहिरीच्या तळापर्यंत गेली नाही.
दरम्यान, घडलेल्या दुर्घटनेत पीकअपमधील कृष्णा पवार, आकाश जगन पवार, निल पवार हे गंभीर जखमी झाले. खमींच्या डोक्याला, खांद्याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या होत्या. गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून शहरातील फडके हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
किरकोळ जखमी असलेल्यांमधील गाडीचा चालक सचिन चव्हाण, रवी पवार, एका चार वर्षांच्या मुलासह इतर दोघांना वैजापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींपैकी सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती नवनाथ मोहिते यांनी दिली. लग्नाचे वऱ्हाड चक्क मरणाच्या दारात अशी स्थिती तालुक्यातील सोनार वस्तीच्या पवार कुटुंबाची झाल्याने चिंता वाढली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.