बेल्हे – टाकळी ढोकेश्वर येथील शैलेश गोरक्षनाथ झावरे व श्वेता गोरक्षनाथ झावरे यांची एमपीएससीतून निवड होऊन भाऊ राजपत्रित वर्ग1 अधिकारी आणि बहीण राजपत्रित वर्ग2 अधिकारी झाली. आमदार अतुल बेनके व माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी नुकताच अणे (ता. जुन्नर) येथे शैलेश याचा सन्मान केला.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021 मध्ये शैलेशची निवड होऊन त्याला जलसंपदा विभाग मिळाला असून सहायक कार्यकारी अभियंता राजपत्रित वर्ग 1 अधिकारी जलसंपदा विभागातील सर्वोच्च पद मिळाले. त्याचा महाराष्ट्रातून चौथा क्रमांक आला आहे. त्याचे शिक्षण बीई सिव्हिल झाले असून तो सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे 2019 मध्ये पास झाला. त्याची आई गृहिणी असून वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत.
त्याची बहीण श्वेता ही स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण झाली होती. जलसंपदाच्या सहायक अभियंता (वर्ग- 2) पदावर कार्यरत आहे. शैलेशला त्याच्या बहिणीने मार्गदर्शन केले. शैलेशचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी सन्मान केला. निवृत्त नायब तहसीलदार भिमाजी दाते, नितीन साठे, रामदास दाते, श्रीधर झावरे, अक्षय वदक आदींनी अभिनंदन केले आहे.