पिंपरी, दि. 11 – “व्हॅलेन्टाइन डे’ येत्या मंगळवारी आहे. “व्हॅलेन्टाइन डे’च्या निमित्ताने वाढणारी मागणी लक्षात घेऊन गेल्या आठवड्यापासून बाजारात फुलांची मोठी आवक सुरू झाली आहे. “डच’ गुलाबाच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात डच गुलाबाच्या एका काडीची विक्री 10 ते 30 रुपये दराने केली जात आहे.
“व्हॅलेन्टाइन डे’साठी मावळातील शेतकरी खास गुलाबाचे उत्पादन घेतात. “व्हॅलेन्टाइन डे’साठी शेतकऱ्यांकडून गुलाब फुलांची विक्री राखून ठेवली जाते. गेल्या आठवड्यापासून मावळातील शेतकऱ्यांनी परदेशात गुलाब फुलांची निर्यात सुरू केली आहे. निर्यातक्षम गुलाबांची निर्यात झाल्यानंतर “व्हॅलेन्टाइन’डे साठी खास मागणी असणाऱ्या या गुलाबाची पिंपरीतील घाऊक फूल बाजारात आवक सुरू झाली आहे. एका गड्डीत गुलाबाच्या दहा ते वीस काड्या असतात. चांगल्या प्रतीच्या डच गुलाबाच्या गड्डीला सध्या 80 ते 150 रुपये असा दर आहे. आठवडाभरापासून मावळ, मुळशी तसेच शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी डच गुलाब विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. फूल बाजारातून गुजरातला आणि गोव्यात डच गुलाब विक्रीसाठी पाठवला जातो.
यंदा पोषक हवामानामुळे चांगले उत्पादन
यंदा गुलाबासाठी पोषक हवामान असल्याने उत्पादन चांगले झाले आहे. गुलाब फुलांची प्रतवारी चांगली असल्याने भाव चांगले मिळत आहेत. दोन दिवसांत गुलाबांची आवक आणखी वाढेल. “व्हॅलेंटाइन डे’निमित्त मावळातील डच गुलाब मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केला जातो. यंदा देखील गुलाबांची निर्यात झाली. निर्यातक्षम गुलाबांची निर्यात झाल्यानंतर, स्थानिक पातळीवर गुलाबांची आवक सुरू झाली आहे.
पिंपरीतील फूल बाजारात 27 गाळेधारक आहेत. सकाळी 6 ते 11 या वेळेत फुलांची विक्री होते. सध्या डच फुलाच्या गड्डीचा भाव 80 ते 150 रुपयांना आहे. दोन दिवसांत त्याची दरवाढ होण्याची शक्यता आहे. किरकोळ विक्रेते आकर्षक वेष्टन लावून विकतात. त्यामुळे एका फुलाचा दर 10 ते 30 रुपयांपर्यंत जातो.
– राजू शिंदे, विभाग प्रमुख, पिंपरी फूल उपबाजार.