डेराडून – भारतीय जनता पक्षाच्या उत्तराखंड सरकार मधील मंत्री हरकसिंह रावत यांची काल मध्यरात्री राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने आपल्याशी चर्चा न करताच परस्पर हा निर्णय घेतल्याने मंत्र्यांना रडू कोसळले. त्यांच्या हकालपट्टीचे कारण आता समोर आलं आहे.
हरकसिंह रावत यांनी आपल्या सूनेला पक्षाने तिकीट द्यावे, असा आग्रह धरला होता. मात्र स्थानिक नेतृत्वाने ही मागणी फेटाळली, त्यानंतर त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी करण्यासाठी दिल्ली गाठली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागल नाही.
उत्तराखंडच्या लँसडाऊन जागेवरुन अनुकृती गुसाईं हिच्यासाठी हरक सिंह रावत दावा करत होते. पक्षाची उमेदवारी मिळाली नसली तरी लँसडाऊनच्या जनतेचा आशीर्वाद अनुकृतीच्या मागे असल्याचं रावत म्हणाले. कुठल्याही पक्षाकडून तिने निवडणूक लढवली तरी ती राज्याच किंवा देशाचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास हरक सिंह रावत यांनी व्यक्त केला.
मात्र भाजपने हरकसिंह यांचीच पक्षातून हकालपट्टी केली. त्यांच्या विरोधात पक्ष विरोधी कारवायांचाही ठपका ठेवण्यात आला आहे. या संबंधात हरकसिंह रावत यांनी सांगितले की आपल्याला भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत चर्चा करण्यासाठी बोलावले होते. परंतु मला प्रवासातील अडचणीमुळे तिकडे जाण्यास विलंब झाला. मी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करणार होतो पण त्याच्या आधीच आपली पक्षाने हकालपट्टी केली असे सांगताना त्यांना रडू कोसळले. आता त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.