नवी दिल्ली – ईडीने आज एमएमटीसी या सरकारी क्षेत्रातील कंपनीच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात एका सराफ व्यावसायिक कंपनीची तसेच त्याच्याशी संबंधित अन्य व्यावसायिकांची एकूण 363 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. एमबीएस ज्वेलर्स प्रा. लि, एमबीएस इम्पेक्स प्रा. लि., सुकेश गुप्ता, अनुराग गुप्ता, नीतू गुप्ता, वंदना गुप्ता आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या एकूण 363 कोटींच्या मालमत्तेवर तात्पुरती टाच आणण्यात आली आहे.
या सर्वांवर एमएमटीसी (मेटल्स ऍन्ड मिनरल्स ट्रेडिंग कॉपोर्रेशन) या कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर या प्रकरणात सन 2014 साली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकेश गुप्ता याने बायर्स क्रेडिट स्कीम अंतर्गत या सरकारी मालकीच्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले. त्यासाठी त्याने कोणतीही सिक्युरिटी दाखल केली नव्हती.
कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी ही सोने खरेदी केली होती. त्यातून सरकारी कंपनीला तब्बल 504 कोटी रुपयांचे नुकसान आले. सुकेश गुप्ता याने एमएमटीसीच्या हैदराबाद येथील अधिकाऱ्यांशी संगनमत केले होते व आपल्या व्यवसायाचे खोटे आकडे दाखवून एमएमटीसीकडून सोने खरेदी करून कंपनीची फसवणूक केली होती. त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.