सुपा – नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे एका कारचालकास मारहाण करत अज्ञात चोरट्यांनी लुटले. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चालक अरुण गौतम भोले यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुपा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर मोरे यांच्या वाहनावरील (क्र. एमएच-03 डीए 7081) चालक अरुण गौतम भोले ( रा. वाशी नाका, न्यू आर्यन पार्क, चेंबूर, मुंबई) हे रविवारी (दि.7) त्यांच्या मूळ गावी बीड येथे गेले होते. तेथील काम आटोपून रात्री ते मुंबईकडे जाण्यासाठी निघाले असता, उशीर झाल्याने नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील गणेश कृपा पेट्रोल पंपावर रात्री बारा वाजता कार लावून त्यात ते झोपले होते.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरटे वाहनाजवळ आले. त्यांनी भोले यांना उठवून वाहनातून बाहेर येण्यास सांगितले. भोले वाहनातून बाहेर आले असता, त्यांना या चोरट्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच भोले यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चेन व खिशातील 7 हजार 200 रुपये काढून घेतले. तसेच जाताना भोले यांच्या वाहनाची चावी घेवून गेले. त्यानंतर भोले यांनी सुपा पोलीस ठाणे गाठले. यावेळी भोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्ग दर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे हे करत आहेत.