मुंबई : विकासदराला चालना देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात मंगळवारी सलग सातव्या सत्रात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही कंपन्यांनी पुन्हा नवीन उच्चांक गाठला असल्याचे समोर आले आहे. मागच्या सत्रामध्ये सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 51,575 वर पोहोचला होता. आतापर्यंतची ही विक्रमी पातळी आहे. त्यानुसार, आज निफ्टीनेही पहिल्यांदाच 15,188 चा आकडा पार केला आहे. परदेशी बाजारातील हालचालींमुळे शेअर मार्केटमध्ये उसळी आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मागच्या सत्रानंतर सेन्सेक्स 228 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी वाढून 51,577 वर व्यापार करत आहे. तर निफ्टी 81 अंकांच्या म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढीसह 15,197 वर आहे. मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन विक्रमांसह मार्केट करत आहेत. मुंबई शेअर बाजारावर आधारित सेन्सेक्सचे 30 शेअर्स मागच्या सत्रातल्या तुलनेमध्ये 135.46 अंकांच्या वाढीसह 51,484.23 वर उघडला आणि 51,575.20 वर पोहोचला. याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या 50 शेअर्स मागील सत्रांच्या तुलनेत 48.35 अंकांनी वाढून 15,164.15 वर पोहोचला आणि 15,188.45 मार्केट करत आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भांडवली बाजारात आलेल्या तेजीचे वातावरण अजूनही कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स 617 अंकांनी वधारताना दिसला. दिवसाअखेर सेन्सेक्स 51348 च्या पातळीवर राहिला. बाजारातील तेजीचा हा सलग सहावा दिवस होता. यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.62 लाख कोटींची भर पडली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टीही 191 अंकांनी वधारला होता.
अमेरिकेकडून प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याने आशियाई बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. याशिवाय, कोरोनाच्या लसीकरण मोहीमेने बऱ्यापैकी वेग पकडल्याने गुंतवणुकदारांचा आशावाद आणखी वाढला आहे. त्यामुळे गुंतवणुकदार बाजारपेठेत आणखी पैसे ओतत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
भारतासह जगातील शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळेल. शेअर बाजारांचे इंडेक्स वधारणार नसले तरी मिड कॅप आणि स्मॉलकॅफ शेअर्समध्ये तेजी असेल, असा अंदाज ब्रोकरेज फर्म वर्तवत आहेत.येत्या काळात एलं अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक वाढू शकते. पुढील एक वर्षात निफ्टी 15 हजार ते 16 हजारादरम्यान राहील, असा अदाज वर्तवण्यात आला आहे.