पाचगणी – महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या कादांटी खोऱ्यातील 105 गावांचा विकास आराखडा आजही प्रतीक्षेत राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. डीजिटील युगात आजही दुर्गम कांदाटी खोऱ्यात मुलभूत दळणवळणासह शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, गावठाणाच्या जटील प्रश्नांचा सामना कांदाटी खोऱ्यातील सर्वसामान्य जनतेला सामना करावा लागत आहे.
अतिशय पाऊसमान असलेल्या या दुर्गम, डोंगराळ भागातील लोकांना कष्टमय जीवन जगावं लागतं आहे. राज्याचे मुख्यमंत्री महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब गावचे. त्यामुळे आता कांदाटीच्या जखमेवर फुंकर मारली जाणार म्हणून जनतेला दिलासा मिळाला. मात्र, गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ लोटून देखील कांदाटीचा विकास आराखडा रखडला आहे.
पालकमंत्री मॅरेथॉन बैठका घेत असल्याचे चित्र दिसत असले तरीही फक्त कागदी घोडे दामटण्याचा प्रकार स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची बदली झाली, नवीन अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी याबाबत लक्ष घातलेले दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावासह भागाचा विकास आराखडा प्रशासनातील उदासनीतेमुळे पूर्ण न झाल्यामुळे सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. हा विकास आराखडा लवकरात लवकर तयार करुन मुलभूत सुविधांचा मिळाव्यात अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दुर्गम भागाचा कायापालट लवकरात लवकर करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकनाथ शिंदे दरे येथे मुक्कामी
महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी हेलिकॉप्टरने पोहचले आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्याच दरे तांब येथे स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विजय नायडू, माजी नगरसेवक कुमार शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा एक दिवसाचा असून शेतीमध्ये रममाण होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गेल्या काही दिवसांपासून व्यस्त वेळापत्रकामुळे शेतीकडे जाता आले नसल्याने शेतातील पिकांचा अन् शेतीची परिस्थिती पाहण्याकरीता मुख्यमंत्री शिंदे खास दरे तांब येथे आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. एकनाथ शिंदे मंगळवारी दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहे.