- करोनामुक्त बाधितांच्या चारपट
- केवळ 1549 रुग्ण उपचाराधीन
पिंपरी – सोमवारी शहरातील रुग्णवाढ दोनशेच्या आत आली. गेल्या 24 तासांमध्ये 158 जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तब्बल 713 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आली आहे. मृतांची संख्या देखील दहाच्या आत आली आहे. ही बाब दिलासादायक ठरत आहे.
शहरामध्ये सोमवारी 158 बाधित रुग्ण आढळले. तर, सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील 3 तर, शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या 1 हजार 352 सक्रिय बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 197 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. एकूण 1 हजार 549 सक्रिय बाधित रुग्ण आहेत. शहरामध्ये आत्तापर्यंत एकूण 13 लाख 85 हजार 913 संशयित करोना रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 54 हजार 90 बाधित रुग्ण आढळले. तर, 2 लाख 48 हजार 315 रुग्ण करोनामुक्त झाले. 4 हजार 226 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महापालिकेकडून आत्तापर्यंत 5 लाख 28 हजार 744 नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी सर्वाधिक लसीकरण हे 45 वर्ष वयोगटापुढील 4 लाख 8 हजार 68 नागरिकांचे करण्यात आले. त्या खालोखाल 99 हजार 192 हेल्थ केअर आणि फ्रंटलाइन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. तर, सर्वात कमी लसीकरण हे 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे झाले आहे. आत्तापर्यंत या वयोगटातील केवळ 21 हजार 484 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
जिल्हा रुग्णालयातून तिघे करोनामुक्त
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातून सोमवारी (दि. 14) तिघे करोनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. साखरगाव (ता. वेल्हा), परवाडी (ता. भोर), सांगवी येथील हे रुग्ण आहेत. त्यामध्ये 2 पुरुष आणि 1 महिला रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 11 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 4 हजार 157 रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यापैकी 1 हजार 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 352 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. 353 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 2 हजार 67 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.