जेरूसलेम – इस्रायलमध्ये नाफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारचा शपथविधी रविवारी होणार आहे. नवीन सरकारच्या शपथविधीबरोबरच बेंजामिन नेत्यान्याहू यांची 12 वर्षांची अनिर्बंध कारकीर्दही समाप्त होणार आहे.
या नवीन सरकारमध्ये डाव्या, उजव्या आणि मध्यममार्गी अशा सर्व विचारांच्या पक्षांचे सदस्य असणार आहेत. त्यामुळा हे खऱ्या अर्थाने एक आघाडी सरकार असणार आहे. आघाडीमध्ये अरब पार्टी देखील सहभागी असणार आहे.
बेनेट यांनी रविवारी आपल्या नवीन मंत्र्यांची यादी संसदेमध्ये सादर केली. मात्र त्यांच्या भाषणामध्ये बेंजामिन नेत्यानाहू यांच्या समर्थकांनी वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या गदारोळातच बेनेट यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. प्रचंड विरोधाभास असलेल्या व्यक्तींबरोबर काम करण्याची क्षमता असल्याबद्दल आपल्याला स्वतःचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशावर वारंवार निवडणूका लादल्या गेल्याने देशात तीव्र द्वेष पसरला आहे. आर्थिक ताणही आला आहे. हा मूर्खपणा थांबवण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागांमधील जबाबदार नेत्यांनी एकत्र येण्याची गरज होती, असेही त्यांनी सांगितले.
इराणला अण्वस्त्र सज्ज बनू दिले जाणार नाही
इराणला अण्वसत्र सज्ज बनू दिले जाणार नाही असे बेनेट यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. इस्रायल कोणत्याही करारामध्ये सहभागी होणार नाही आणि आपल्या कृतीसाठी इस्रायलला नेहमीच पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे. इराणच्या आण्विक कराराचे पुनरुज्जीवन करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना इस्रायलचा विरोधच असेल, असेही त्यांनी सांगितले.