पुणे- शिवाजीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्याच्या अटी शर्ती शिथील कराव्यात अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सीओईपी च्या मैदानावर सुरू करण्यात आलेल्या जंबो रूग्णालयात दाखल करून घेताना रुग्णांना आणि नातेवाईकांना मन:स्ताप सहन करावा लागला आहे. त्याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सेनेने याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे.
तसेच, संशयित रुग्णांनी उपचारासाठी कोठे जायचे? अत्यवस्थ रुग्णांनी करोनाचा रिपोर्ट येईपर्यंत काय करायचे? फॅमिली डॉक्टर ने कोविड सेंटरला रुग्ण पाठवणे हा संदर्भ पुरेसा नाही का? असे प्रश्न सेनेने निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत.
इंजिनीरिंग कॉलेज आणि बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी नेमके काय करायचे याचे मार्गदर्शन प्रसिद्धीमाध्यमातून करावे, संबंधित सेंटरचे हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करावेत. सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आलेल्या करोना संशयित परंतु अत्यवस्थ रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था करावी. रात्री-बेरात्री कोणताही रुग्ण नाकारण्यात येऊ नये, अशी मागणीही सेनेने केली आहे.
गेल्या काही दिवसात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांचे अनुभव कटु आहेत. तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव, सफाई, सुयोग्य आहार, गर्दीचे नियोजन, समुपदेशन आणि नातेवाईकांसाठी हेल्पलाईन इत्यादी कमतरता जाणवत आहेत.
त्यामुळे या विषयासंदर्भात चर्चेसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत आपल्या आरोग्य खात्याच्या तज्ज्ञ आणि जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, विधानसभा समन्वयक डॉ. अमोल देवळेकर यांनी केली आहे.