पुणे -पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीसवरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोहोंनीही दिले.
वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे, तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचना…
पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा.
यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाणी उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे
कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करा.
विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्या.
वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा.
औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा.
कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर येथील रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडा दिसता कामा नये याची दक्षता घ्या.