पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर आता क्यू.आर कोड बसविण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वेचे तिकीट तपासणीस (टी.सी.) आणि हमाल कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर क्यू. आर. कोड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे मोबाईलद्वारे हा कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना संबंधित कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती समजणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान वाढत्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे स्टेशन येथून रोज सुमारे दीड लाखापेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. परिणामी स्टेशन आवारात रोज मोठी गर्दी असते. गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांकडून प्रवाशांना “टार्गेट’ करीत त्यांची फसवणूक केली जाते. अनेकदा हमाल असल्याचे सांगत त्यांची फसवणूक केली जाते. यासह एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत 5 तोतया तिकीट तपासणीसांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे तोतया तपासणीसांची वाढती संख्या विचारात घेता तिकीट तपासणीसांनी क्यू. आर. कोड असणारे ओळखपत्र देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना एखाद्या कर्मचाऱ्याबाबत शंका आल्यास क्यू. आर. कोड तपासून त्याची खात्री करणे शक्य होणार आहे. यासह रेल्वेचा कारभार अधिकपारदर्शक झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.