मुंबई : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर,आदी उपस्थित होते.
मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी
मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे हेदेखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
जालना –मुंबई वंदे भारत ट्रेनचे आगमन झाले त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले . प्रवाशांचे अनुभव उत्सुकतेने ऐकत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत रेल्वे कोचमध्ये तब्बल अर्धा तास दिला. प्रवाशांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले.