नवी दिल्ली -देशात पुढील आठवड्यापासून करोनालसींचा बूस्टर (प्रीकॉशन) डोस देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र नागरिकांना बूस्टर डोसही समान लसीचाच दिला जाणार आहे. म्हणजेच, याआधी ज्या लसीचे दोन डोस घेतले; त्याच लसीचा तिसरा डोस घ्यावा लागेल.
देशात बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेचा प्रारंभ 10 जानेवारीपासून होईल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक त्यासाठी पात्र आहेत.
दुसरा डोस घेतल्यापासून 9 महिन्यांचा (39 आठवडे) कालावधी झालेल्यांना बूस्टर डोस मिळू शकेल. बूस्टर डोस कुठल्या लसीचा असणार याविषयी मोठी उत्सुकता होती. आता तो समान लसीचाच घ्यावा लागणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.