मुंबई – राज्यात आज दिवसभरात तब्बल 26 हजार 538 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या ऍक्टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता 87 हजार 505वर पोहोचला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल 797वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा 67 लाख 57 हजार 032 इतका झाला आहे. त्यापैकी 87 हजार 505 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज दिवसभरात राज्यातील एकूण 5 हजार 331 बाधित करोना निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 96.55 टक्के इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 8 करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा एकूण मृत्यूदर 2.09 टक्क्यांवर आला आहे.