- तळेगाव नगर परिषदेचा गलथान कारभार
- ठेकेदार, संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे – येथील नगर परिषद हद्दीतील बनेश्वर स्मशानभूमीमध्ये एका इसमाच्या मृत्यू पश्चात अंत्यसंस्कार करताना अचानक गॅस संपल्याने मृतदेह सुमारे दीड ते दोन तास शवदाहिनीतच ठेवावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
करोना विषाणूचा संसर्गाने एकाचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीमध्ये मंगळवारी (दि. 30) रोजी रात्री दहाच्या सुमारास मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेह आणला होता. या वेळी अग्निसंस्कार सुरू असतानाच गॅस शवदाहिनीतील सिलिंडरमधील गॅस संपल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या वेळी ठेकेदाराने हलगर्जीपणाचा कळस गाठला असून, सुमारे दोन तासाने सिलिंडर उपलब्ध करून दिला. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह अडकवून ठेवल्याने मृताचे नातेवाईक मित्र परिवार चांगले संतापले होते.
याविषयी नगर परिषदेच्या विशेष सभेत सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आरोप-प्रत्यारोप करत प्रशासनाला धारेवर धरले व ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी देखील केली. काही दिवसांपूर्वीच अग्निशमन दलातील अग्नी बंबासाठी पुरेसे डिझेल नसल्यामुळे तो सुरू झाला नसल्याने तळेगाव नगर परिषदेवर ताशेरे ओढण्यात आले होते. दिवसेंदिवस गलथान कारभारामुळे व प्रशासनात अनागोंदी कारभार सुरू असल्याने तळेगावातील जनतेचे मोठे हाल होत आहेत. आमदार सुनील शेळके यांनी देखील कर भरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या, अशी सूचना केली होती. करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात डिजिटल ट्रान्जेक्शन पद्धतीचा वापर करत असताना नगर परिषदेला आमदारांनी आठवण करून द्यावी, ही बाब मोठी खेदाची आहे.