प्रकाश यादव
पिंपरी – औद्योगिक, कामगारनगरी ते स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटीकडे वाटचाल करत असताना पिंपरी-चिंचवड शहरात मुलींचा जन्मदर मात्र मुलांच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी जन्माला आलेल्या एकूण शिशूंमध्ये एक हजार मुलांमागे सरासरी 80 मुली कमी आहेत. तथापि, समाजात अजूनही मुली नकोशा झाल्या आहेत की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
महिला आपल्या कतृत्वाने आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर असताना मुलींचा जन्म दर अजूनही मुलांच्या तुलनेत कमी आहे, ही बाब समाज मनाला वेदना देणारी आहे. महिलांना राजकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये समान संधी असताना बऱ्याचदा कौटुंबिक निर्णयात समाज त्यांना समान हक्क देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. ही समाजातील सामाजिक विषमता दूर करणे काळाची गरज आहे. 21 व्या शतकात आपण वावरत असताना ग्रामीण भागासह शहरी भागात काही प्रमाणात वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलाचा हट्ट केला जातो. पित्याचे नाव पुढे चालवणारी पितृसत्ताक कुटुंब पध्दती आजही स्त्रियांना कमी लेखते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये अद्यापही मुलींचा जन्म हे संकट मानले जाते. यामुळेच की काय, मागील तीन वर्षांपासून शहरात मुलींचा जन्मदर काही प्रमाणात कमीच आहे.
शहरातील महापालिकेच्या रूग्णालयांसह खासगी रूग्णालयात सध्या एक हजार मुलांमागे 80 मुली कमी आहेत. गर्भलिंगनिदान आणि भ्रूणहत्येविरोधात स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केल्यानंतर शहरात गर्भातील शिशूचे लिंगनिदानास चाप बसला असला तरी मानसिकतेत मात्र फारसा झालेला दिसत नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह कर्नाटकमध्ये जाऊन काही जण लिंगनिदान करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मुले आणि मुली यांच्या जन्मदारात असलेली तफावत प्रश्न उपस्थित करत आहे. गेल्या तीन वर्षात 37 हजार 967 मुलांचा जन्म झाला तर केवळ 31 हजार 856 मुली जन्माला आल्या.
करोनाकाळात काहीशी सुधारणा
2019 मध्ये 1 हजार मुलांमागे केवळ 907 मुली जन्मल्या होत्या. 2020 या करोनाच्या वर्षांत मात्र मुलींच्या जन्मदरात काहीशी सुधारणा झाली. 2020 मध्ये एक हजार मुलांमागे 930 मुलींचा जन्मदर होता. परंतु निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा जन्मदरात घट पहायला मिळाली 2021 या वर्षात एक हजार मुलांमागे 920 मुली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2020 मध्ये कडक लॉकडाऊन असलेल्या एप्रिल महिन्यात जन्मलेल्या एकूण शिशूंमध्ये मुलींची संख्या अधिक होती. एप्रिल 2020 मध्ये जन्मलेल्या एकूण शिशूंमध्ये 928 मुली होत्या तर मुलांची संख्या 925 इतकी होती. याचप्रमाणे जानेवारी 2021 मध्ये एकूण शिशूंमध्ये 995 मुलींचा तर 986 मुलांचा जन्म झाला. शहरी भाग असूनही मुलींच्या जन्मदारात वाढ करण्यासाठी आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.