ठसका (मारुती जैनक) : उगा फुक्काच्या उठाठेवी करण्यात आम्ही पट्टीचं पटाईत. भले कुणी काहीही म्हणो. आम्हास त्याचं ना घेणं ना देणं! म्हंतात ना, मारणाऱ्याचा हात धरणं सोप्प; पण बडबडणाऱ्याचं थोबाड दाबणं महाकठीण. म्हणुनशानं आम्ही असल्या जित्राबांकडं सपशेल कानाडोळा करतो. सांगायचं म्हंजे आमच्यातल्या खटपट्यानं नुकतंच “माहिती अधिकार’ नामाभिवलीचं अस्त्र उपसलं. राळेगणसिद्धी निवासी श्रीमान अण्णाबुवांनी हे कायदारुपी अस्त्र आमच्या स्वाधीन केलं. जस्सं की, महादेवानं सानथोर देवादिकांना प्रसन्न होऊन वररुपी अस्त्र बहाल केलं, तस्सं अण्णाबुवांनी ते आम्हास दिलं. “माहिती अधिकार’ नामक हे अस्त्र चालवून बघावं, अस्सं आम्हास वाटलं. मग काय, आम्ही थेट मुंबापुरीच्या विधानसभेवर धडक मारली. आमदारांना बिदागी कित्ती, याची माहिती आम्ही इमानेइतबारे मागितली. अर्थात यामागचा आमचा हेतू आक्षी निर्मळ व्हता. ही मंडळी लोकांसाठी केवढं रक्त आटवतात. अख्ख्या तालुक्याचा गाडा हाकायचा! हे काय कुण्या गाडीवानासारखं सोप्प वाटलं की काय? त्यांच्या कष्टासारखी बिदागी त्यांना मिळायलाच पाहिज्ये, एवढंच आमचं म्हणणं. ती मिळत नसंल तर त्या बिच्चाऱ्यांसाठी उपोषणाचं अस्त्र उपसायचं, अस्सा आमचा होरा.
तिथल्या कारकुनानं आमदारांच्या बिदागीची कुंडली आमच्या हातावर टेकवली. त्या कुंडलीतले आकडे बघून भोवळच आली. कस्संबस्सं आम्ही सोतास सावरलं. क्षणाचाही विलंब न करता आम्ही मनातल्या मनातच आमदारांचं बारसं घातलं. आता आमदार म्हणायचं नाय. म्हणायचं तर मालदारच! आता ही कुंडली जनताजनार्दनापुढे खुली करावी, अस्सं आम्हास वाटलं. त्यासाठीच ही ठसकेगिरी!
मालदार महोदयांना दरमहा अवघी 249348 रुपयांची बिदागी मिळते. अस्सं आम्हास सांगण्यात आलं. ही बिदागी बघून आमचं डोळंच भरून आलं. जनसेवेसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या या बापुड्यांना एवढीच बिदागी. हा न्याय म्हणावं, की अन्याय? असोत. मालदारांना मिळणाऱ्या बिदागीचा रकानाच आम्ही इथं दिलाय. निसंदेह अन् निसंकोचपणे तो बघून हरिनामाचा मंत्र जपायला आमची कसलीच हरकत नाय. रकान्याशिवायचा हिशेब तर न्याराच. आमच्या मालदारांची हिकमतगिरी करणाऱ्या पीएंना तीस हजार रुपये, त्यांच्या मोटारीच्या सारथ्याला वीस हजार रुपये वेगळेच मोजले जातात. शिवाय एसटी फुक्कट. रेल्वे फुक्कट. राज्यांतर्गत विमान वारी 32 वेळा, तर राज्याबाहेर आठ वेळा फुक्कट. एवढा लाड कमी की काय, म्हणुनशानं मालदार महाशयांनी नवी कोरी मोटार विकत घेतली तर तिचं व्याजही सरकारच्याच तिजोरीतून. शिवाय ते माजी जाहले की पेन्शन.
1977 साली ही पेन्शन व्हती अडीचशे रुपये. आत्ता ती 21 लाखाच्या घरात गेलीय. म्हंजे रिटायर्डमेंटलाही चंगळच! आज घडीला 605 माजी मालदार 50 ते 60 हजार, 101 मालदार 60 ते 70 हजार, 51 जण 80 ते 90 हजार, तर 13 जण लाखाच्यावर पेन्शन घेताहेत. विशेष म्हंजे बोटावर मोजण्याएवढे सोडले तर बाकी सारे कोट्यधीश. आता या कोट्यधीशांना अब्जाधीश करायचंय, असा चंग मायबाप सरकारनं बांधला नसावा कशावरून?…या सवालानं आम्हीच मूग गिळून गप्प राहण्याचा शहाणपणा केला.
आमदार महोदयांचा महिन्याचा पगार
मूळ वेतन- 1,82,200
महागाई भत्ता- 39,148
टपाल भत्ता- 10,000
टेलिफोन भत्ता- 8000
संगणक चालक-10,000