पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या 12 जानेवारीला होण्याचे नियोजन करण्यात आले असून याबाबत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
सन 2013 पासून शाळांमध्ये शिक्षकपदाची नोकरी मिळविण्यासाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घालण्यात आले आहे. वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात वर्षातून एकदाच परीक्षात येऊ लागली आहे. गेल्या दीड वर्षात एकही परीक्षा घेण्यात आलेली नाही.
शासनाकडे परीक्षेस परवानगी मिळावी यासाठी दोन वेळा परीक्षा परिषदेकडून प्रस्तावही पाठविण्यात आला होता. शासनाकडून त्यास मान्यता मिळाली आहे.
परीक्षेच्या नियोजनासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यात उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्रे पाठविणे, परीक्षा केंद्रांची व्यवस्था करणे यासाठी व्यवस्थित नियोजन करावे लागते. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. याचे वेळापत्रक लवकरच परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.