पुणे – जी-20 परिषदेसाठी रस्त्यांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरातील पाच रस्त्यांसाठी तब्बल 50 लाखांच्या कुंड्या आणि 50 लाखांची परदेशी सजावटीची रोपे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, या खरेदीत रोपांचे दाखविण्यात आलेले दर बाजारभावापेक्षा अधिक असल्याचे समोर आल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या दरांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दर अधिक असल्यास या निविदा रद्द करण्यात येणार आहेत.
उद्यान विभागाला जी-20 साठी तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी पाच रस्त्यांवर खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नगर रस्ता, सोलापूर रस्ता, पाषाण रस्ता, खराडी बायपास, बाणेर रस्त्याचा समावेश आहे. येथील उड्डाणपूल आणि रस्त्यांवर कुंड्या ठेवण्यासाठी दोन निविदा उद्यान विभागाने काढल्या आहेत. यासाठी 1,790 मोठ्या कुंड्या आणि 1,790 ही परदेशी झाडे खरेदी करण्यात येणार होती.
या झाडांची होणार खरेदी…
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फॉक्सटेल प्लाम-200 झाडे-किंमत 1,800 रु. प्रतिझाड, रॅफिस प्लाम 100 झाडे-प्रतिझाड 4 हजार रु., बोगन वेल 200 झाडे-प्रतिझाड 5 हजार रु, फिकस स्टार लाइट 250 झाडे- प्रतिनग 4 हजार रु., फिकस ब्लॅक 250 झाडे प्रतिनग 5 हजार रु., ऍरका प्लाम 280 झाडे-प्रतिनग 800 रुपयांप्रमाणे ही झाडे खरेदी करण्यात येणार आहेत. वस्तू आणि सेवा कर धरुन या झाडांसाठी 49 लाख 96 हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे.