नवी दिल्ली – अयोध्येमध्ये राम मंदिरात राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त जगभरात राम भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतही या निमित्ताने हिंदू नागरिकांमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. राम मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना होण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेतील मंदिरेही सजली आहेत.
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अमेरिकेतील मंदिरांची स्वच्छता आणि सुशोभिकरण करण्यात येते आहे. तसेच आठवडाभर चालणार् या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिक या कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
राम मंदिराच्या उद्घाटनामुळे सनातन धर्माला उर्जितावस्था प्रदान होणार आहे. याचा आनंद संपूर्ण शहर साजरे करत आहे, असे हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष कल्याण विश्वनाथन यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
तब्बल ५०० वर्षांनंतर जगभरातील हिंदूंच्या श्रद्धा आणि आनंदोत्सवासाठी एक महत्वाचा दिवस उजाडतो आहे, असे टेक्सासमधील श्री सीता राम फौंडेशनचे पदाधिकारी कपिल शर्मा यांनी म्हटले आहे. या मंदिराच्या माध्यमातून ह्युस्टन येथे राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सुंदरकांड, संगीत, नृत्य, गायनाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हवन, अभिषेक, महाप्रसाद आणि पूजाही मांडली जाणार आहे. अयोध्येतून आणलेली धूळ भाविक कपाळी लावणार आहेत, असेही शर्मा यांनी सांगितले.
वॉशिंग्टनमधील आनंदोत्सवामध्ये मेरिलॅन्डचे गव्हर्नर वेस मूर देखील सहभागी होणार आहेत. तर ग्रेटर वॉशिंग्टनमधील कार्यक्रमात पाकिस्तानी अमेरिकन देखील सहभागी होणार आहेत.अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, संपूर्ण अमेरिकेत १ हजार मंदिरे आहेत. यापैकी बहुतेक सर्व मंदिरांमध्ये आनंदोत्सवाचे योजन करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या वॉशिंग्टन शाखेने मेरीलॅन्डमध्ये कार रॅली, ढोल ताशा वादनाचे कार्यक्रम ठरवले आहेत. अमेरिकेतील किमान २० शहरांमध्ये कार रॅली आयोजित केली गेली आहे. शिकागो, ह्युस्टन आणि लॉस एंजेलिसमध्ये राम मंदिराच्या सोहळ्याचे थेट प्रसारण मोठ्या स्क्रीनवरून करण्याचीही योजना आहे.