कलंदर: स्वभाव

उत्तम पिंगळे

काल प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेल्यानंतर सर मला म्हणाले, एवढे दिवस होता कुठे? मी सांगितले, गावाकडे गणेश जयंतीचा उत्सव असतो तेथे दोन दिवस जाणे झाले.

सर “स्वभाव’ या विषयावर काहीतरी लिहीत होते. मला म्हणाले, स्वभाव म्हणजे काय? मी थोडा निरुत्तर झालो; पण एकूणच एखाद्याची वागण्याची पद्धत व त्याने त्याच्या समोर आलेल्या प्रसंगांशी केलेली प्रतिक्रिया असे काही तरी म्हणता येईल. त्यावर ते बरोबर असे म्हणाले, पण ते पुढे म्हणाले की, असे म्हणतात, स्त्रियांचा स्वभाव काही समजत नाही. म्हणजे स्त्री स्वभाव समजू शकत नाही. मी त्यांना विचारले की तुम्ही असे का म्हणता? त्यावर सर म्हणाले मी म्हणतो असे नाही, पण एकूणच बहुतेक लिखाणातून बऱ्याच लेखकांनी हेच मत मांडले आहे.

नंतर ते म्हणाले, फार पूर्वी युरोपीय देशांमधील गोष्ट वाचल्याचे आठवते. एक राजा असतो व त्याला सुंदर कन्या असते. एके दिवशी ती जंगलात शिकारीला गेलेली असता एक तरुण तिच्या नजरेत भरतो. तो आपल्या मैत्रिणीसोबत वनात विहार करत असतो. मग राजा राजकन्येचा विवाह करावा असे ठरवतो. ते ऐकताच राजकन्या म्हणते की, तिला तो अमूक अमूक तरुण त्या जंगलांमधील भावलेला आहे. तो खूप शूर आहे व तिला त्याच्याशीच लग्न करावयाचे आहे. राजा सैनिकांना पाठवतो. सैनिक त्याला घेऊन येतात. विवाहासंबंधी विचारताच तो तरुण सांगतो की, त्याचा विवाह आधीच ठरलेला आहे त्यामुळे तो राजकन्येला नम्रपणे नकार देतो. राजकन्या रागाने लालबुंद होते; पण त्याला एका दिवसाचा अवधी दिला जातो.

दरम्यान दुसऱ्या दिवशी एका मोठ्या बंद रिंगणात दोन मोठे पिंजरे आणले जातात व तरुणाला रिंगणात सोडले जाते. त्याला सांगतात की एका पिंजऱ्यामध्ये त्याची मैत्रीण तर दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये एक वाघ आहे. शेवटचे म्हणून राजा पुन्हा लग्नाबाबत विचारतो, त्यावर ताबडतोबीने तो तरुण नम्रपणे राजकन्येशी विवाह करावयास नकार देतो. मग एक सैनिक त्या मोठ्या रिंगणावर जातो, त्याच्याकडे दोन्ही पिंजरे उघडण्याची दोरी असते. तेथे उभे राहून तो राजकन्येकडे पाहतो. राजकन्या डोळ्याने काहीतरी खूण करते. आता तो कोणता तरी एक दरवाजा उघडणार असतो. एकात त्या तरुणाची मैत्रीण असते तर दुसऱ्यामध्ये वाघ असतो. झालं येथेच कथा संपली. आता प्रश्‍न आहे की तो कोणता दरवाजा उघडणार? वरवर पाहता सोपे असलेला हा प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहे, असे म्हटले जाते. प्राध्यापक मला म्हणाले की तुम्हीही जरा नीट विचार करा.

अशीच एक गोष्ट, एका श्रीमंत माणसाचे निधन होते व मृत्यूनंतर त्याची सर्व संपत्ती तो पत्नीच्या नावे करतो. एक महागडी गाडी मात्र विकून टाकावी व येणारे उत्पन्न त्याच्या प्रेयसीला देऊन टाकावे असे तो लिहून ठेवतो. आपल्या सवतेला रक्‍कम मिळणार पाहून त्याची पत्नी जाहिरात देते व ती गाडी शंभर रुपयाला विकून टाकते. गाडी घेणाराही शेवटी कागदपत्रे घेताना विचारतो की तुम्ही एवढ्या कमी किमतीत कशी विकता? त्यावर ती पत्नी वरीलप्रमाणे कारण सांगते. मग स्वतः खुशीत म्हणते की, घे बया तुझ्या गाडीचे पूर्ण पैसे. आता यातील खरं किती व किती खोटं हा वेगळा मुद्दा असला तरी एकूणच त्यातून स्त्री काय करू शकते याची चुणूक दिसते. अर्थात पुरुष याला काही अपवाद नाहीत. अनेक विचित्र प्रसंग स्वभावामुळे घडलेले दिसून येतात. जुने लोक म्हणतात ना स्वभावाला औषध नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.